स्वा. वि.दा. सावरकर नाट्यगृहातील समस्यांबाबत नाट्य परिषदेचे नगराध्यक्षांना निवेदन

रत्नागिरी दि. १३ :- येथील स्वा. वि.दा. सावरकर नाट्यगृहामधील विविध समस्यांबाबत अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, शाखा रत्नागिरीच्या कार्यकारिणीने रत्नागिरीच्या नगराध्यक्ष श्रीमती शिल्पाताई सुर्वे यांची भेट घेऊन त्यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. या समस्यांवर नगरपरिषद प्रशासन आणि नगराध्यक्षांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, यावर तातडीने कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे.
सावरकर नाट्यगृह हे रत्नागिरीतील सांस्कृतिक केंद्र असून येथील अनेक असुविधांमुळे कलाकार, तंत्रज्ञ आणि प्रेक्षकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर नाट्य परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी नगराध्यक्षांची भेट घेतली.
निवेदनातील प्रमुख मागण्या:
नाट्य परिषदेने दिलेल्या निवेदनात नाट्यगृहाच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधत खालील मागण्या प्रामुख्याने मांडल्या आहेत:
पायाभूत सुविधा आणि स्वच्छता : नाट्यगृहातील काही ठिकाणचे बंद असलेले लाईट्स तातडीने सुरू करावेत, इमारतीच्या पाठीमागील बाजूला काँक्रिटीकरण करण्यात यावे, तसेच स्वच्छतेसाठी नियमित फिनेलचा पुरवठा करण्यात यावा.
कलाकार व तंत्रज्ञांसाठी सोयी : नाटकातील कलाकार आणि तंत्रज्ञ यांच्यासाठी हक्काचा भोजन कक्ष (डायनिंग हॉल) तयार करावा.
तांत्रिक सुधारणा : नाटकाच्या लाईट्ससाठी एक ज्यादा पावर पॅक व एक नवीन स्लाइडर घेण्यात यावा. तसेच म्युझिक सिस्टम सुरळीत चालण्यासाठी स्टॅबिलायझर बसविण्यात यावे.
नियम व शिस्त: नाट्यगृहाच्या मुख्य प्रेक्षागृहामध्ये खाण्याचे पदार्थ नेण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात यावी.
जाहिरात फलक : नाट्यगृहाच्या आवारामध्ये नाटकाच्या जाहिरातींचे फलक (बॅनर्स) लावण्यासाठी एकाच साईजमध्ये चॅनल तयार करण्यात यावे, जेणेकरून परिसर विद्रूप होणार नाही.
नाट्यगृहाच्या उत्तम व्यवस्थापनासाठी नगरपरिषद प्रशासन, लोकनियुक्त नगराध्यक्ष, नगरसेवक आणि रंगकर्मी यांची मिळून एक संयुक्त कमिटी तयार करावी. या कमिटीची दर दोन महिन्यातून एकदा सभा घेण्यात यावी, जेणेकरून नाट्यगृहातील समस्या वेळेत प्रशासनाच्या लक्षात येऊ शकतील.
या निवेदनाची दखल घेत नगराध्यक्ष सौ. शिल्पाताई सुर्वे तसेच मुख्याधिकारी श्री. गारवे साहेब यांनी नाट्यगृहातील या सर्व समस्यांवर तातडीने आणि योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन नाट्य परिषदेच्या शिष्टमंडळाला दिले.
याप्रसंगी नाट्य परिषदेचे अध्यक्ष समीर इंदुलकर, कार्यवाह श्री. वामन कदम, तसेच कार्यकारिणी सदस्य सर्वश्री श्रीकांत पाटील, मनोहर जोशी, घनश्याम मगदूम, दादा कदम आणि विजय पोकळे आदी मान्यवर उपस्थित होते

