कोकण रेल्वेकडून विनातिकीट प्रवास करणाऱ्यांना दणका
मे महिन्यात ६१,०५१ अनधिकृत, अनियमित प्रवाशांची प्रकरणे उघडकीस : थकीत रेल्वे भाडे आणि दंडापोटी ३ कोटी ७० लाख वसूल

रत्नागिरी दि.१४ : तिकीटविरहित प्रवासाला आळा घालण्यासाठी कोकण रेल्वेने तिकीट तपासणी मोहीम तीव्र केली असून, मे २०२६ या महिन्यात, कोकण रेल्वेने नियमित तिकीट तपासणी उपक्रमांतर्गत ९५१ तिकीट तपासणी मोहिमा राबवून ६१,०५१ अनधिकृत, अनियमित प्रवाशांची प्रकरणे उघडकीस आणली. या प्रवाशांकडून थकीत रेल्वे भाडे आणि दंडापोटी ३ कोटी ७० लाख वसूल करण्यात आले.
कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (केआरसीएल) सर्व प्रवाशांना सुरक्षित, सुलभ आणि त्रासमुक्त प्रवासासाठी वैध तिकिटासह प्रवास करण्याचे आवाहन केले आहे. खऱ्या प्रवाशांना जास्तीत जास्त आराम आणि सोय मिळावी यासाठी, केआरसीएल रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) कर्मचारी आणि रेल्वे अधिकाऱ्यांच्या समन्वयाने आपल्या संपूर्ण मार्गावर तीव्र तिकीट तपासणी मोहीम सुरू ठेवणार आहे. सर्व प्रवाशांना सुरक्षित, संरक्षित आणि आरामदायक प्रवास सुनिश्चित करण्यासाठी सहकार्य आणि पाठिंबा देण्याचे आवाहन कोकण रेल्वेने केले आहे.


