रत्नागिरीराजकीय

कसबा जिल्हा परिषद गटात विजयश्री खेचून आणणार : विशाखा कुवळेकर यांना विश्वास

मतदारांचा विश्वास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षावर; पंचायत समितीच्या दोन्ही जागांवरही विजय मिळवणार

संगमेश्वर दि. ५ ( प्रतिनिधी ):- नेत्यांनी पक्ष बदलला तरी कार्यकर्ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाजवळ एकनिष्ठ आहेत. शिवसेनेने तळागाळातील कार्यकर्त्यांनाच नेतेपदी बसवले. अशाच तळागाळातील कार्यकर्त्यातून आता नव्याने तयार झालेले नेतृत्व कसबा जिल्हा परिषद गटात विजयश्री खेचून आणेल आणि नक्कीच भगवा फडकवेल असा विश्वास कसबा जिल्हा परिषद गटाच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार विशाखा विजय कुवळेकर यांनी व्यक्त केला. याचबरोबर कसबा आणि परचुरी पंचायत समिती गणावर देखील शिवसेनेचाच भगवा फडकेल असेही कुवळेकर यांनी नमूद केले.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा प्रचार आज सायंकाळी पाच वाजता समाप्त झाला. प्रचाराच्या सांगता दरम्यान कसबा जिल्हा परिषद गटाच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार विशाखा विजय कुवळेकर कसबा पंचायत समिती गणाचे उमेदवार चंद्रकांत फणसे, परचुरी गणाच्या उमेदवार पूजा प्रदीप शितप यांनी एकत्रितरित्या बोलताना सांगितले की, उमेदवारी अर्ज भरल्यापासून आपण कसबा जिल्हा परिषद गट पूर्ण खाडीपट्ट्यासह पिंजून काढला आहे. या दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर प्रेम करणारे सच्चे शिवसैनिक आपल्या विजयासाठी अधिकाधिक परिश्रम घेत असल्याचे दिसून आले. स्वतःच्या स्वार्थासाठी नेत्यांनी जरी पक्ष बदलला असला तरी सर्वसामान्य शिवसैनिक हा उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षावरच आपली नितांत श्रद्धा ठेवून असल्याचे प्रचार दौऱ्या दरम्यान पाहायला मिळाले.

संपूर्ण कसबा जिल्हा परिषद गटात आपण प्रचाराच्या तीन फेऱ्या पूर्ण केल्या. या प्रत्येक फेरी दरम्यान मतदारांचा मिळणारा प्रतिसाद वाढत गेला. वाडी वस्ती आणि गावातून आपल्याला मुद्दामहून बोलवून ग्रामस्थांनी आपल्या समस्या माझ्यासमोर मांडल्या आणि या सर्व समस्या सोडवण्याचे आश्वासन आपण दिले असल्याचे विशाखा विजय कुवळेकर यांनी सांगितले. प्रचाराला मिळालेला मतदारांचा प्रतिसाद पाहता आणि सर्वसामान्य मतदारांचा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेवर असलेला विश्वास पाहता कसबा जिल्हा परिषद गटात आपण विजयश्री खेचून आणू याबरोबरच कसबा आणि परचुरी या दोन्ही पंचायत समिती गणावर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा भगवा फडकवू असा विश्वास उमेदवार विशाखा विजय कुळेकर यांनी व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button