देवरूख पंचायत समितीत ३३ वर्षानतंर सत्तांतर होणार का? याकडे सर्वांचे लक्ष

देवरूख दि.( सुरेश सप्रे) :- शिवसेनेत फुट पडल्याने गत ३३ वर्षे पंचायत समितीवर सत्ताधारी असलेल्या उबाठासेनेला पायउतार करण्यात महायुतीला यश येणार का? याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे..
धामापूर तर्फे संगमेश्वर जिप गटात उबाठा कडून मागिल जिप निवडणुकीत विजयी झालेले पण नंतर राजिनामा देत पक्ष बदलत गुहागर मधुन २०१९मधे विधानसभा निवडणुक लढवत माजी मंत्री भास्कर जाधव यांना जोरदार लढत घाम काढलेले सहदेव बेटकर हे पुन्हा घरवापसी करत रिंगणात आहेत. त्यांची राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सुशिल भायजे यांचेसह अजित कांबळे (वंचित ), जगन्नाथ राऊत (अपक्ष) यांचेशी चौरंगी लढत असली तरी खरा मुकाबला उबाठा विरूद्ध राष्ट्रवादीेतच होणार असल्याचे चित्र आहे. या गटात विद्यमान आमदार शेखर निकम यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
उबाठा सेनेचा बालेकिल्ला समजला जाणारा कडवई गटात तिरंगी लढतीत उबाठाचे आक्रमक नेतृत्व असलेले माजी जि.प. उपाध्यक्ष संतोष थेराडे यांची खरी लढत भाजपाचे तालुकाध्यक्ष विनोद म्हस्के. व आशिष सुर्वे (काँग्रेस) यांच्यात होणार आहे.
कसबा संगमेश्वर गट हा १९९२ पासून राजू महाडीक यांचा बालेकिल्ला असून त्याच्या पत्नी व माजी जिप अध्यक्ष रचना महाडीक या शिवसेनाकडुन रिंगणात असून त्यांची थेट लढत उबाठाच्या विशाखा कुवळेकर यांचेशी होणार आहे.ही लढत एकतर्फी वाटत असली तरी उबाठासेनेची असलेली ताकद तसेच कुणबी व मुस्लिम फॅक्टर कसा चालतो यावरच येथील विजयाचे गणित अवलंबून आहे. या गटाच्या लढतीकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.
मुचरी गटात तिरंगी लढतीत महायुतीकडून माजी जिप सदस्या माधवी गीते यांची राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या नवख्यापण उच्च शिक्षित व अन्यायाविरुद्ध आक्रमकपणे लढणाऱ्या अशी ओळख निर्माण केलेल्या उबाठासेनेच्या ललीता तांबे यांचेशी थेट लढत होणार असल्याचे दिसून येते असले तरी अपक्ष लढत असलेल्या सामाजिक कामात अग्रेसर असलेल्या नृपूर मुळे यांचेकडे दुर्लक्ष केले तर येथील विजयाचे गणित बदलू शकते असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
तालुक्यात महायुती असली तरी कोसुंब गटात तिरंगी लढत आहे.उबाठाच्या मुग्धा जागुष्टे रींगणात असल्या तरी शिवसेना -भाजपा आमनेसामने असुन भाजपाचे प्रमोद अधटराव व माजी जिप अध्यक्ष रोहन बने यांच्यात मैत्रीपूर्ण लढत होत असून माजी आम. सुभाष बने यांची राजकीय शक्ती पणाला लागली असल्याचे चित्र दिसत आहे
साडवली गटात भाजपकडून रुपाली कदम या नवख्या असल्या तरी माजी जिप अध्यक्ष रश्मी कदम यांच्या सुनबाई असून भाजपाचे तालुकाध्यक्ष रूपेश कदम यांच्या पत्नी आहेत. तर उबाठा सेनेकडून माजी मंत्री रवींद्र माने याच्या पत्नी जिप सदस्या नेहा माने यांच्यात थेट लढत होणार असून या गटात रश्मी कदम व माजी मंत्री रवींद्र माने यांची कसोटी पणाला लागणार आहे.
दाभोळे गटात माजी जिप सदस्य व महायुतीचे विलास चाळके यांची वंचित बहुजन आघाडीच्या नवख्या असलेल्या विरश्री बेटकर या विरोधात उभ्या ठाकल्या आहेत.. त्या उबाठाच्या मदतीने कीती आव्हान उभे करतात हे पाहणे महत्वपूर्ण ठरणार आहे.
धामापूर गणात उबाठाचे अजय चव्हाण यांचे समोर भाजपाचे महेश जड्यार यांचे आव्हान आहे तर आरवली गणात उबाठाच्या स्मिता कुंभार राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रिया बेर्डे अशी रंगतदार लढत होणार आहे. कडवई गणात उबाठाच्या अपर्णा जाधव या शिवसेनेच्या सुचिता कदम अशी लक्षवेधक लढत पाहायला मिळत आहे. धामणी गणातून राष्ट्रवादी काँग्रेसचे संतोष भडवळकर व उबाठाचे दत्ताराम लाखण अशी चुरशीची लढत होणार आहे.
कसबा गणात शिवसेनेचे सुरेश माईन यांचेसमोर उबाठाचे चंद्रकांत फणसे तर अपक्ष संदेश झिमण यांचे आव्हान आहे. तर परचरी गणातून शिवसेनच्या शर्वरी वेल्ये यांना उबाठाच्या पुजा शितप यांचेशी सामना करावा लागणार आहे. माभळे गणात भाजपातून उबाठात प्रवेश केलेल्या दिलिप गीते यांचा सामना शिवसेनाच्या सुहास मायंगडे या तगड्या उमेदवाराशी होणार आहे. या गणातून माजी सभापती दिलीप पेंढारी हे उबाठाकडून निवडणूक लढविणार होते. तसा शब्द दिला होता. पण आयत्यावेळी AB फॉर्म भाजपातून आलेल्या दिलिप गीतेंना दिल्याने त्यांनी आपली उमेदवारी मागे घेत थेट शिंदे गटात प्रवेश केल्याने मायंगडे यांचा मार्ग सुकर होईल असा अंदाज व्यक्त होत आहे.मुचरीगणात उबाठाच्या प्रज्ञा गमरे यांचेसमोर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आरूची घवाळी यांचे कडवे आव्हान उभे आहे. कोसुंब गणात उबाठाकडून सुहासिनी भाताडे यांना भाजपाच्या दूर्वा पाष्टे यांचे आव्हान आहे. दोन्ही उमेदवार या देव धामापूर गावातीलच असल्याने या लढतीत कोण बाजी मारणार याकडे लक्ष वेधले आहे निवे गणात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल बाईत व उबाठाचे सुरेश गुरव अशी थेट लढत होणार आहे.
साडवली गणात पालकमंत्री उदय सामंत यांचे निकटवर्ती शिवसेनेचा आक्रमक चेहरा असलेले सचिन मांगले यांच्या पत्नी तृप्ती मांगले यांची लढत उबाठाचे युवासेनेचे नेते व माजी सभापती छोट्या गवाणकर यांच्या पत्नी क्षमा जाधव यांचे होत असल्याने या लढतीत कोण बाजी मारणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
हातीव गणात आम. निकम यांचे निकटवर्तीय मंगेश बांडागळे हे राष्ट्रवादी कडून रिंगणात उतरले असून त्यांना उबाठा शिवसेनेचे प्रदिप ढवळ यांचे कडवे आव्हान असेल. कोंडगाव गणात माजी सभापती व आम. कीरण सामंत यांचे निकटवर्तीय असलेले जयसिंग माने हे शिवसेनेकडून रींगणात उतरले आहेत. त्यांची उबाठाचे तरूण नेतृत्व विद्यासागर तांदळे यांचेशी गाठ पडणार आहे. त्यांचे कडवे आव्हान जया माने कसे पुरतवून लावतात याकडे लक्ष लागले आहे दाभोळेतून शिवसेनेच्या दिपाली जाधव यांचे समोर अपक्षांचे आव्हान आहे. येथे उबाठाकडून उमेदवार उभा नसल्याने दिपाली जाधवांचा मार्ग सुकर दिसत आहे.
या निवडणुकीत सहा गणात उबाठा विरूद्ध शिवसेना अशी थेट लढत होणार आहे. तर पाच गणात राष्ट्रवादी तर दोन गणात भाजपा विरूद्ध उबाठा अशा लढती रंगणार आहेत



