रत्नागिरीराजकीय

कुणबी समाजातील उमेदवारांना मानाचे स्थान देणार – पालकमंत्री उदय सामंत

मयूरबाग येथील महायुती जाहीर सभेत पालकमंत्री उदय सामंत यांचा विजयाचा निर्धार

संगमेश्वर दि. ५ ( प्रतिनिधी ):- मुचरी जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार माधवी गीते, माभळे पंचायत समितीचे उमेदवार सुहास मायंगडे तसेच मुचरी पंचायत समितीचे उमेदवार सौ.घवाळी हे तिघेही मोठ्या मताधिक्याने निवडून येतील, असा विश्वास पालकमंत्री तथा उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांनी व्यक्त केला. माझ्या मतदारसंघातील हे तिन्ही उमेदवार कुणबी समाजाचे असून निवडून आल्यानंतर त्यांना मानाचे स्थान दिले जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

मयूरबाग येथे आयोजित शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस आणि आर.पी.आय. महायुतीच्या जाहीर प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राजेंद्र महाडिक, राजेश मुकादम, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाप्रमुख राजेंद्र पोमेडकर, माजी सभापती दिलीप पेंढारी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सभेत बोलताना पालकमंत्री सामंत यांनी अपक्ष उमेदवारावरही टीका केली. फॉर्म मागे घेण्याच्या दिवशी संबंधित अपक्ष उमेदवाराने मोबाईल स्विच ऑफ ठेवून वरिष्ठांचा मान राखला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आपण नेहमीच विकासात्मक कामांवर भर दिला असून यापुढेही तोच विकासाचा मार्ग सुरू राहील, असे त्यांनी सांगितले.

महायुतीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून आणण्याची जबाबदारी आता कार्यकर्ते आणि मतदारांची आहे, असे आवाहन करत पालकमंत्री उदय सामंत यांनी प्रचाराचा सूर अधिक तीव्र केला. सभेला मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button