
संगमेश्वर दि. ३० ( प्रतिनिधी ):- गुरुपौर्णिमेच्या पावन आणि शुभमुहूर्ताचे औचित्य साधत भारतीय जनता पक्षाने संघटनात्मक विस्ताराला अधिक बळ देण्यासाठी प्रा. राजेंद्र प्रभाकर बोथरे (रा. कडवई, ता. संगमेश्वर) यांची भारतीय जनता पार्टी, संगमेश्वर उत्तर ओबीसी सेल तालुकाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. ही नियुक्ती भाजप ओबीसी मोर्चा दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सहदेव (देवजी) बेटकर यांच्या हस्ते करण्यात आली.
प्रा. राजेंद्र बोथरे यांनी यापूर्वी विविध सामाजिक, प्रशासकीय आणि लोकहिताच्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. त्यांनी मा. तंटामुक्ती अध्यक्ष, मानवाधिकार संघटनेतील पदाधिकारी तसेच विशेष कार्यकारी अधिकारी (Special Executive Officer – SEO) म्हणून उल्लेखनीय कार्य केले असून, समाजसेवेसाठी सातत्याने योगदान देत आहेत. त्यांच्या सामाजिक बांधिलकी, नेतृत्वगुण, जनसंपर्क आणि समाजसेवेची दखल घेत भारतीय जनता पक्षाने त्यांच्यावर ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविली आहे.
गुरुपौर्णिमेच्या मंगलमय दिवशी झालेल्या या नियुक्तीमुळे या निर्णयाला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून, समाजसेवा, संघटन आणि राष्ट्रहितासाठी अधिक जोमाने कार्य करण्याचा निर्धार प्रा. बोथरे यांनी व्यक्त केला आहे.
नियुक्तीपत्र प्रदान करण्याच्या कार्यक्रमास संगमेश्वर उत्तर तालुकाध्यक्ष विनोद म्हस्के, दक्षिण मंडळ अध्यक्ष रुपेश कदम, तालुका सरचिटणीस डॉ. अमित ताटरे, अविनाशजी गुरव, चंद्रकांतदादा जाधव, देवरुख शहराध्यक्ष दत्ताजी नार्वेकर तसेच तालुक्यातील असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते आणि भाजपचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी प्रा. बोथरे यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
प्रा. राजेंद्र प्रभाकर बोथरे यांच्या नियुक्तीमुळे संगमेश्वर तालुक्यातील भाजपच्या ओबीसी सेलच्या संघटनात्मक कार्याला नवी दिशा आणि ऊर्जा मिळेल, असा विश्वास पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या नियुक्तीबद्दल विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर, कार्यकर्ते आणि नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.



