सामाजिक

वार्षिक राशीभविष्य २०२६

ज्योतिर्विद्या वाचस्पती डॉ प्रसन्न मुळ्ये, (DASC/JVV)

नमस्कार!

सर्व हिंदुस्थान वासियांना दीपावली आणि नूतन वर्षाच्या मनःपूर्वक कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा!!

हे नूतन वर्ष आपणांस सुखसमृद्धीचे, भरभराटीचे आणि दीर्घायुरारोग्याचे जावो. आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत, हीच श्री स्वामी समर्थ महाराज चरणी विनम्र प्रार्थना!!

सध्या गुरु महाराज मिथुन राशीत विराजमान असून १ जून २०२६ रोजी कर्क राशीत प्रवेश करणार आहेत. त्यानंतर दि. ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी ते शीघ्र गतीने सिंह राशीत प्रवेश करणार असून पुन्हा २४ जानेवारी २०२७ रोजी वक्री होऊन कर्क राशीत प्रवेश करणार आहेत. यावर्षी शनिदेव मीन राशीतून मार्गक्रमण करीत असून संपूर्ण वर्षभर मीन राशीतच रहाणार आहेत. राहू आणि केतु हे सध्या अनुक्रमे कुंभ आणि सिंह राशीत विराजमान असून २५ नोव्हेंबर २०२६ रोजी तेसुद्धा वक्री चालीने अनुक्रमे मकर व कर्क राशीमध्ये प्रवेश करणार आहेत. हर्षल संपूर्ण वर्षभर वृषभ राशीत, नेपच्यून संपूर्ण वर्षभर मीन राशीत आणि प्लुटो संपूर्ण वर्षभर मकर राशीत विराजमान असणार आहे.

पुरातन काळापासून १२ राशींप्रमाणे भविष्याचा विचार करण्यासाठी रविपासून शनिपर्यंत सातच ग्रहांचा विचार केला जात होता. राहू-केतूंचा शोध लागल्यानंतर त्यांचाही विचार राशीभविष्याच्या दृष्टीने करण्यास सुरुवात झाली. परंतु या कलियुगाच्या २१ व्या शतकात हर्षल, नेपच्यून आणि प्लुटो हे तीन ग्रह मानवी जीवनावर विशेषत्वाने जास्त प्रभावशाली होतांना दिसत आहेत. त्यामुळे मी माझ्या वार्षिक राशिभविष्य लेखनामध्ये त्या ग्रहांच्या मानवी जीवनावर होणाऱ्या प्रभावाचा विचार करूनच गेले काही वर्ष लेखन करीत आहे. तर आता वळूया धनु ते मीन या चार राशींच्या सन २०२६ च्या वार्षिक राशीभविष्याकडे!

धनु –

धार्मिक आणि अध्यात्मिक विचारसरणीच्या पायावर उभी राहिलेली आपली राशी. राशीच्या बोधचिन्हाप्रमाणेच धनुष्यावरील बाणाला लावलेल्या प्रत्यंचेप्रमाणे आपला स्वभाव सहसा कोणाला ओळखता येणेच कठीण आहे. आपल्याकडे पाहूनच समोरच्या व्यक्तीला आपल्याबद्दल आदरयुक्त भीती असते. या वर्षी आपल्या राशीचे अधिपती गुरुमहाराज हे आपल्या राशीच्या सप्तम स्थान, आयुष्य स्थान आणि भाग्य स्थान अशा तीन स्थानांतून मार्गक्रमण करणार आहेत आणि वर्ष अखेरीला पुन्हा आपल्या अष्टम स्थानात येणार आहेत. शनिमहाराज सध्या आपल्या चतुर्थ म्हणजेच सुख स्थानात आहेत. त्याच वेळी तृतीयस्थानात सध्या विराजमान असलेला राहू नोव्हेंबर अखेरीला द्वितीय स्थानात आणि भाग्यात विराजमान असलेला केतू आपल्या अष्टम स्थानात प्रवेश करणार आहे. सध्या कौटुंबिक जबाबदारीचे ओझे घेऊन आपण जीवनात मार्गक्रमण करत आहात. त्यामुळे थोडे निराश, हताश होऊन गेलेले असाल. मात्र वर्ष अखेरीसच या जबाबदारीतून आपल्याला काहीसा दिलासा मिळत असल्याचे दिसून येईल. घरातील वयोवृद्ध व्यक्तींसाठी वेळ आणि पैसा अशा दोन्ही गोष्टी खर्च कराव्या लागतील. त्यामुळे आपल्या कामाकडे मात्र दुर्लक्ष होऊ देऊ नका. या संपूर्ण वर्षभरामध्ये कोणत्याही नवीन उपक्रमांची सुरुवात न करणेच आपल्यासाठी फायदेशीर राहील.अचानक काही लाभ होतील, जसे की शेअर्स, लॉटरी, किंवा वारसाहक्काने काही अचानक लाभ होतील. काही अंशी संसारातून विरक्ती आल्यासारखेच वागायला लागाल. परंतु असे करणे सध्याच्या परिस्थितीत आपल्याला मानवणारे नाही, हे लक्षात ठेवा. मातेच्या आरोग्याच्या दृष्टीने थोडी काळजी घ्यावी लागेल. अचानकपणे एखादा आजार उद्भवून त्यानिमित्ताने दवाखान्यात खेटे मारावे लागतील. त्यामुळे आपली मानसिक शांती कमी होऊन निराश व्हाल. अशा वेळी श्री दत्त उपासना करावी. वर्ष अखेरीस काही नवीन कल्पना सुचतील आणि मनाने नाही ठरवलेत तरी त्यामध्ये अचानक सहभागी व्हाल. जे लोकं सध्या शिक्षण घेत आहेत, त्यांच्यासाठी हे वर्ष कष्टदायक राहणार आहे. अभ्यास करूनही त्याचा परिणाम गुणतालिकेत न दिसणे, परीक्षेच्या वेळी केलेला अभ्यास न आठवणे अशा गोष्टी होऊ शकतात. त्यासाठी अभ्यासाबरोबरच मनःस्वास्थ्य उत्तम ठेवणे जरुरीचे आहे. या सर्व गोष्टींकडे लक्ष देत असतांना त्याचा परिणाम आपल्या तब्येतीवर होणार नाही ना, यासाठी खबरदारी घ्यावी. कर्ज प्रकरणांमध्ये यश मिळेल किंवा जुन्या कर्ज प्रकरणांची परतफेड अचानक एखादा मार्ग सापडून होण्याची शक्यता आहे . सध्या च्या या काळात जोडीदाराबरोबर वादविवाद करणे टाळावे. याउलट आपल्या प्रत्येक निर्णयात आणि कार्यात जोडीदाराचा सल्ला हा लाखमोलाचा ठरेल. याच काळात बरेच दिवस ज्यांचे विवाह ठरलेले नाहीत, अशांचे विवाह ठरतील आणि होतील. प्रेमपकरणात अति उत्साह किंवा अधिकारवाणीचे वर्तन आणि बोलणे टाळा. वर्ष अखेरीला सासुरवाडीकडील मंगलकार्यात सहभागी व्हावे लागेल किंवा काही विशेष जबाबदारी अंगावर पडेल. अध्यात्मिक उन्नतीच्या दृष्टीने हे वर्ष उत्तम राहणार असून वैद्यक ज्योतिष आणि वेदशास्त्रामध्ये अध्ययन करणाऱ्या लोकांसाठी अनुकूलता राहील. कुटुंबासोबत तीर्थयात्रेला जाण्याचे योग येतील. व्यवसायात अनेक अडचणींचे निराकरण होऊन व्यापाराला गती मिळेल. त्यामुळे आपण काहीसे सुखावून जाल. व्यवसायाच्या किंवा नोकरीच्या ठिकाणी अधिकारवाणीपेक्षा बोलण्यात मार्दवता असेल तर कामे सहज होतील आणि सहकाऱ्यांची सहानुभूती मिळवाल. लाभाचा विचार करता या वर्षी खर्च जास्त होत असला तरीही लाभदेखील उत्तम होणार आहेत. काही वेळा अचानक होणाऱ्या धनलाभाने आपण अचंबित व्हाल आणि तेवढेच सुखवूनही जाल. काही लोकांना नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने परदेशवारी करावी लागेल. तर काही लोकांना बढती-बदली मिळाल्याने घरापासून दूर जावे लागेल. एकंदरीत वर्षभराचा विचार करता अवघड वळणांचा असा घाट रस्ता काही काळाने सुकर होऊन मार्गक्रमण सफल होईल.

मकर –

आपल्या राशीनुसार आपण कष्ट करण्याची इच्छा असूनही मनाने कायम निरीच्छ राहता. संथ गतीने परंतु निश्चित ध्येयाकडे वाटचाल करतांना संधी मिळाल्यावर आपल्या संथ गतीत फरक करून झटक्यात पुढे जाण्यात आपण पटाईत आहात. साक्षात शनिदेवांचीच आपली राशी. आपले राशीस्वामी शनिमहाराज हे सध्या आपल्या पराक्रमस्थानातून मार्गक्रमण करत आहेत. यावर्षी गुरुमहाराजांचे भ्रमण राशीच्या षष्ठस्थानातून, सप्तमस्थानातून आणि अष्टमस्थानातून होणार आहे. राहूचे भ्रमण सध्या आपल्या धनस्थानातून होत असून २५ नोव्हेंबर रोजी तो आपल्या वक्री चालीने आपल्या लग्नस्थानात प्रवेश करेल, तर सध्या अष्टमस्थानात असणाऱ्या केतूचे भ्रमण सप्तमस्थानात होणार आहे. या वर्षी प्रत्येक वेळी आपण स्वतः निर्णय न घेता कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांचा सल्ला घेतल्यास आपल्यासाठी फायदेशीर राहील. मे महिन्यानंतर कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील आणि त्यासाठी कौटुंबिक धन खर्च करावे लागेल. नवीन वर्षाचे काही नवीन संकल्प योजले असतील तर वर्षाच्या सुरुवातीलाच पूर्ण करण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करा. त्यानंतर काही न काही कारणाने त्यामध्ये विलंब होऊ शकतो. नवीन प्रकल्पाच्या निमित्ताने क्वचित प्रसंगी घरापासून लांब जाण्याचे किंवा परदेश प्रवासाचे योग येतील. कुटुंबातील एखाद्या सदस्यासंबंधित काही कारणासाठी वेळ आणि धन खर्च करावे लागेल. व्यावसायिक वाहन, शेती, दुसरे घर अशा गोष्टी खरेदी करण्याच्या विचारात आपण असाल तर या वर्षात खरेदी केल्यास अशा गोष्टींपासून सुखसमाधानाबरोबरच व्यावसायिक यशही निश्चित मिळेल. सध्या शिक्षण घेत असलेल्या लोकांसाठी हे वर्ष अत्यंत महत्त्वाचे राहणार असून पदवीपर्यंतच्या शिक्षणात काही वेळा अडचणी उद्भवणे, केलेला अभ्यास परीक्षेच्या वेळी न आठवणे अशासारख्या गोष्टी होण्याची शक्यता आहे. मात्र उच्च शिक्षण घेणाऱ्या आणि स्पर्धा परीक्षांसाठी प्रयत्न करत असलेल्या लोकांसाठी हे वर्ष आशादायी राहणार आहे. प्रकृतीच्या तक्रारी असणाऱ्यांचे आरोग्य सुधारून दिलासा मिळेल. मात्र मधुमेह आणि त्वचेसंबंधित त्रास असणाऱ्या लोकांनी जून महिन्यापासून विशेषत्वाने काळजी घेणे महत्त्वाचे राहील. विवाहेच्छुचे विवाह होतील. प्रेमप्रकरणात यश मिळेल आणि वडीलधारे लोक विवाहाला संमती देतील. जोडीदाराबरोबर वादविवाद करणे टाळा. काही वेळा जोडीदाराच्या सल्ल्याने वागल्यास निश्चितच लाभ झाल्याशिवाय राहणार नाहीत. या दृष्टीने जून नंतरचा कालावधी हा फारच महत्त्वाचा राहील. तुमच्या किंवा जोडीदाराच्या कुटुंबातून वर्षाच्या उत्तरार्धात एखादी दुःखद वार्ता कानी येईल. बौद्धिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या, त्यातही विशेषतः लेखन करणाऱ्या लोकांसाठी हे वर्ष मोठ्या प्रसिद्धीचे राहील. प्रसिद्धीसोबतच मानसन्मान तसेच पुरस्कार मिळण्याच्याही संधी चालून येतील. नोकरी-व्यवसायात काही वेळा अडचणी येऊन देखील आपल्या अंगच्या कलागुणांना वाव मिळेल आणि केलेल्या एखाद्या विशेष कामामुळे आपली प्रसिद्धी होईल. त्याचे फल म्हणून नोकरीतील पगारात वाढ, एखादे अनपेक्षित बक्षीस मिळणे, व्यवसायात नवीन गोष्टींची भर पडणे अशा गोष्टी होतील. लाभाचा विचार करता खर्च कितीही वाढत असला तरीही त्याचा ताळमेळ घालून पुढे जाण्यासारखी परिस्थिती राहील, किंबहुना जास्तीचे लाभ मिळतील. एकंदरीतच हे वर्ष कष्टसाध्य सुयश देणारे आणि यशाच्या शिखरापर्यंत नेणारे राहणार आहे.

कुंभ –

बारा राशींमधील कुंभ ही अकरावी राशी मुळातच शास्त्रीय राशी म्हणून ओळखली जाते. अंगी असणारा नैसर्गिक धीरगंभीरपणा, मंथन करण्याची वृत्ती, शांत विचार आणि स्थिर स्वभाव यामुळे समाजामध्ये आपल्याकडे अत्यंत आदराने पाहिले जाते. आपले राशीस्वामी शनिमहाराजांचे भ्रमण आपल्या कुटुंबस्थानातून होत आहे. आपल्या राशीचा शनि साडेसातीचा शेवटचा टप्पा मार्च २०२५ पासून सुरू झाला आहे. त्याच बरोबर राहूचे भ्रमण आपल्याच राशीमध्ये वक्री चालीने सुरु आहे. या वर्षी गुरुमहाराज आपल्या पंचमस्थानातून भ्रमण करत असून ते १ जून ला आपल्या षष्ठस्थानात आणि ऑक्टोबरच्या मध्यानंतर शीघ्र गतीने आपल्या सप्तमस्थानात प्रवेश करणार आहेत. आपल्या राशीच्या लोकांना साडेसातीची भीती कधीच नसते. मात्र आपल्या राशीच्या कारकत्वाप्रमाणे थोडे शांत किंवा सुस्त असणारे लोक आपल्या तब्येतीची हेळसांड करतात आणि मग ते कुठेतरी अंगलट येत असते. एप्रिल ते सप्टेंबर या काळात काही तब्येतीची तक्रार उद्भवून त्यासाठी वेळ द्यावा लागेल. येणाऱ्या वर्षभरात मित्रमैत्रिणींचा सहवास उत्तम लाभेल आणि त्यांच्या मार्फत काही लाभही होतील. काही नवीन गोष्टी करण्यासाठी अंतर्मनाने होकार देणे महत्त्वाचे असते. याचा प्रत्यय यावर्षी येईल आणि काही नवीन प्रकल्प राबवायला सुरुवात कराल. घरासंबंधित नुतनीकरण करण्याचे किंवा बदल करण्याचे विचार येतील. मात्र त्यासाठी आर्थिक बाबींचा विचार जास्त महत्त्वाचा ठरेल. शिक्षण घेत असलेल्या लोकांसाठी मे महिन्यापर्यंत होणारे पंचमातील गुरुचे भ्रमण अचानक शैक्षणिक दिशा बदलणारे ठरेल. शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना हे वर्ष जून पर्यंत उत्तम राहील. नावलौकिक प्राप्त होईल. ज्योतिष किंवा तत्सम विद्यांमध्ये उत्तम अभ्यास होऊन त्याचा लाभ आर्थिक दृष्टया उत्तम मिळेल. आरोग्याच्या दृष्टीने देखील हे वर्ष उत्तम राहणार असून प्रकृतीच्या चिंता मिटतील. व्यवसायाच्या नवीन शाखा सुरु होतील. काही वेळेला आपण कुटुंबासाठी वेळ देऊ शकणार नाही आणि त्यामुळे कुटुंबात वादावादी होऊन कलह निर्माण होण्याची शक्यता आहे. याच काळात आपण धार्मिक आणि अध्यात्मिक प्रगतीच्या दृष्टीने उत्तम वाटचाल कराल. त्यामुळे आपल्या आर्थिक आणि सामाजिक प्रगतीचा आलेख उंचावत जाईल. व्यावसायिकांना भागीदारामुळे उत्तम लाभ होऊ शकतो. त्यामुळे गरजेचे असल्यास भागीदारी करायला हरकत नाही. व्यवसायातील कामाचा ताण वाढत असला तरी भावंडे आणि सहकारी, तसेच काही प्रसंगी कुटुंबातील सदस्यांचे सहकार्यही उत्तम मिळेल. एकंदरीतच या वर्षी आर्थिक लाभ उत्तम होतील. गुंतवणूक करतांना मात्र योग्य विचार करूनच करा. हे सर्व करत असताना विशेषतः स्त्रियांनी २०२६ सालच्या सप्टेंबर महिन्यापासून स्वतःच्या आरोग्याकडे जास्त लक्ष द्या. हातपाय दुखणे,पोटाचे आणि गर्भाशयाचे विकार तसेच मधुमेहासारख्या आजारांपासून स्वतःची काळजी घ्या. बाकी एकंदरीत विचार करता कुंभ राशीच्या लोकांना हे वर्ष उत्तम राहील, यात शंका नाही.

मीन –

अगदी राशीच्या नैसर्गिक गुणांप्रमाणेच चंचलपणा, हळवेपणा आणि खरेपणाही आपल्या राशीच्या व्यक्तींमध्ये पहायला मिळतो. चटकन दुसऱ्यावर विश्वास ठेवणे हा आपला नैसर्गिक गुण काही वेळा आपल्यावरच उलटतो. परंतु तरीदेखील एक गुणवान राशी म्हणून या राशीकडे पाहिले जाते. आपल्या राशीचे स्वामी गुरुमहाराज हे सध्या राशीच्या सुखस्थानातून भ्रमण करत असून १ जून ला पंचमस्थानात तर त्यानंतर अतिशीघ्र चालीने पुढे षष्ठस्थानी जाणार आहेत. शनिदेव सध्या मीन राशीत असून वर्षभर आपल्याच राशीत असणार आहेत. आपले मन स्थिर ठेवून उत्तम कर्म करत रहा. सध्या कुंभ राशीत असणारा राहू आणि सिंह राशीतील केतू हे २५ नोव्हेंबर २०२६ रोजी अनुक्रमे मकर व कर्क राशीत वक्री गतीने जाणार आहेत. तसे पाहिल्यास हे वर्ष हे खऱ्या अर्थाने केलेल्या कष्टाचे अचानक लाभ देणारे राहणार आहे. विशेषतः शिक्षण क्षेत्रात अध्यापनाचे काम करणारे लोक, देवालयातील पुजारी, पुरोहित आणि ज्योतिष किंवा अशा क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी हे वर्ष खऱ्या अर्थाने अनपेक्षित लाभ मिळवून देणारे राहील. या सर्वांसाठीची मेहनत करत असताना काही वेळा कुटुंब आणि घरापासून लांबही रहावे लागेल. मध्यंतरीच्या काळात मातेच्या प्रकृतीची चिंता लागून राहिली होती, परंतु आता चिंता मिटतील. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने हे वर्ष मन लावून अभ्यास करणे आणि केलेले अध्ययन नीट लक्षात ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न करणे आवश्यक आहे. अन्यथा परिणाम आपल्या या वर्षीच्या निकालावर निश्चितच होतील. सर्व धावपळ करत असताना स्वतःच्या प्रकृतीकडे मात्र दुर्लक्ष अजिबात करू नका. पित्त, डोकेदुखी, मान, हात, मणके दुखणे किरकोळ वाटत असले तरीही त्याकडे दुर्लक्ष करू नका. वर्षाच्या मध्यापर्यंत विवाहेच्छुचे विवाह ठरतील आणि होतील. प्रेमप्रकरणात मात्र समज-गैरसमजातून दुरावा निर्माण होऊन शेवट होण्याची वेळ येईल. या वर्षी अनेक नवीन संकल्पना आपल्या डोक्यातून निघतील, मात्र त्यांची पूर्तता करण्यासाठी सर्वांत महत्त्वाची असणारी जोडीदाराची साथ राहू केतू सारखे खलप्रवृत्तीचे ग्रह मिळू देतील असे वाटत नाही. त्यामुळे सहकारी, मित्र यांच्या मदतीने पुढे जावे लागेल. मानसिक ताणामुळे अस्वस्थ होऊ नका, अन्यथा त्याचा त्रास तुम्हालाच भोगावा लागणार आहे. उच्च शिक्षणाच्या दृष्टीने सुरु असलेल्या प्रयत्नात यश मिळणे कठीण आहे. धार्मिक व अध्यात्मिक शिक्षणाची परिपूर्ती होऊन आपणांस जीवनात स्थिरावण्याचा मार्ग मोकळा होईल. नोकरी-व्यवसायात हाताखालच्या लोकांचे अपेक्षित सहकार्य मिळणार नाही, त्यामुळे कामे व्हायला थोडासा उशीर होऊ शकतो. शत्रू लपून-छपून आपल्या विरुद्ध कारवाया करण्याचा प्रयत्न करतील आणि त्याचा त्रास तुम्हाला होईल. त्यामुळे महत्त्वाचे म्हणजे आपले काम आपणच करावे. त्यासाठी कोणावरही अवलंबून राहू नये. केलेल्या कामाचे चीज निश्चित होईल. मिळणारे लाभ थोडे उशिराने मिळाले, तरी ते कुटूंबातील लोकांना लाभदायक असतील. सर्वच गोष्टी स्वतःसाठी नसतात, याची प्रचिती या वर्षी आल्याशिवाय राहणार नाही. खर्चाचे प्रमाणही या वर्षी थोडे जास्त राहील. परंतु काही वेळा आकस्मिक रित्या एखाद्या गोष्टीसाठी खर्च करण्याची वेळ आली तरी घाबरून जाऊ नये. एकंदरीत विचार करता आपल्या राशीला या वर्षी लाभांचे प्रमाण कमीजास्त होत राहील, परंतु घाबरण्याचे कारण नाही. साडेसातीची भीती सोडून कर्मावर विश्वास ठेवाल तर सगळ्या गोष्टी सुकर होतील याची खात्री बाळगा.

धन्यवाद!!

ज्योतिर्विद्या वाचस्पती डॉ प्रसन्न मुळ्ये, (DASC/JVV)

संस्थापक अध्यक्ष – “श्री चैतन्य ज्योतिष अभ्यास मंडळ, रत्नागिरी. ISO 9001-2015 मानांकन प्राप्त संस्था

संपर्क – ९४०५९५४७२९. 

(शंका निरसन आणि मार्गदर्शनासाठी संपर्क करावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button