लांजातील बेनी बुद्रुक येथे बिबट्याचा घरात घुसून हल्ला; दोन जण जखमी

लांजा दि. ५ :- तालुक्यातील बेनी बुद्रुक कुसुमळेवाडी मध्ये रात्री टीव्ही पाहत असताना घरात घुसून बिबट्याने दोघांवर हल्ला केल्याची घटना बुधवारी (३ जून) रात्री ९:३० वाजण्याच्या सुमाराला घडली. यामध्ये संतोष गोविंद सुर्वे (वय ५०) आणि हर्षद राजेंद्र सुर्वे (वय १९) हे जखमी झाले आहेत.
बेनी बुद्रुक येथील संतोष गोविंद सुर्वे व त्यांची पत्नी सीमा हे बुधवारी रात्री ९:१५ वाजण्याच्या दरम्यान घरातील हॉलमध्ये टीव्ही बघत बसले होते. त्यावेळी अचानक बिबट्याने घराच्या दरवाजासमोर येऊन डरकाळी फोडली. त्याच्या आवाजाने पती-पत्नी दोघेही घाबरून गेले. त्यानंतर काही क्षणातच संतोष सुर्वे हे बसलेल्या बेडवर येऊन बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला.
बिबट्याच्या हल्ल्यानंतर संतोष यांनी जिवाच्या आकांताने आरडाओरडा केला. त्यांच्या आवाजाने घराशेजारी राहणारा हर्षद राजेंद्र सुर्वे धावत तिथे आला. घराच्या दरवाजात आलेल्या हर्षद याच्यावरही बिबट्याने हल्ला केला. सुर्वे यांच्या घराजवळून ओरडण्याचा आवाज ऐकून शेजाऱ्यांनी धाव घेतली. ग्रामस्थांनी आरडाओरड केल्यानंतर बिबट्याने तिथून धूम ठोकली. या हल्ल्यात संतोष सुर्वे आणि हर्षद सुर्वे हे दोघे जखमी झाले आहेत. त्यांना लांजा ग्रामीण रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
या घटनेची माहिती पोलिस पाटील दत्ताराम आपणकर यांनी वन विभागाला दिली. त्यानंतर वनपाल धुळू कोळेकर, वनरक्षक नमिता कांबळे, जलद बचाव पथक सदस्य अमित लांजेकर यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.



