
जैतापूर दि. ५ : “आम्ही शोधतोय आपल्यातील कलाकार” या उपक्रमांतर्गत राजन लाड यांच्या “लय भारी कोकण” आणि फ्लॅश आर्ट अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने जैतापूर येथील वाडा परिसरातील डिलाईट होम स्टे येथे आयोजित करण्यात आलेल्या एकदिवसीय कराओके गायन कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या कार्यशाळेसाठी अलिबाग येथून विशेष उपस्थित राहिलेले कराओके तज्ञ गणेश श्रीधर पावसकर यांनी सहभागी कलाकारांना कराओके गायनाविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. कराओके गायन करताना आवाजाचा वापर, गाण्याची निवड, लय-तालाचे महत्त्व, सादरीकरणातील बारकावे तसेच स्टेजवरील आत्मविश्वास याबाबत त्यांनी उपयुक्त टिप्स दिल्या. मार्गदर्शनाबरोबरच त्यांनी आपल्या सुरेल गायनकलेचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली.
या कार्यशाळेला सागरी पोलीस ठाणे, नाटेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, मिठगव्हाणे ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष विलास चेऊलकर, ज्येष्ठ नागरिक श्रीधर पावसकर, सिनेकलाकार सुनील करगुटकर, अजीम जैतापकर, सई जोशी, मेघना जोशी, श्रावणी परांजपे, संजय कांदे, आनंदा मोरे, राज पाध्ये, शशांक पावसकर, अभिषेक शिरवडकर, गणेश बहिरे , रुपेंद्र कोठारकर आदींसह अनेक संगीतप्रेमी व गायन रसिक उपस्थित होते.
कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी राकेश दांडेकर यांनी उत्कृष्ट ध्वनी व्यवस्था उपलब्ध करून देत मोलाचे सहकार्य केले. सहभागींच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे भविष्यात राजापूर तालुक्याच्या विविध भागात अशा आणखी उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
कराओके गायन क्षेत्रात नवोदितांना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळेमुळे अनेकांना आपली गायनकला सादर करण्याची आणि नव्या तंत्रांची ओळख करून घेण्याची संधी मिळाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजन लाड यांनी केले



