महाराष्ट्ररत्नागिरी

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नाशिक येथील नंदिनी नदी स्वच्छता महाअभियान; जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या अनुयायांचा उत्स्फूर्त सहभाग

नाशिक दि. ५ : कुंभमेळा मंत्री नामदार गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या “उन्नत नाशिक” अभियानांतर्गत जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नंदिनी नदी स्वच्छता महाअभियानाचा उत्साहात शुभारंभ झाला. जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेतून हजारो अनुयायी तसेच अन्य पर्यावरणप्रेमींनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.

मुंबई नाका ते नासर्डी पूल या दरम्यानच्या नंदिनी नदी परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यामध्ये नदीपात्रातील वेली, गवत तसेच प्लास्टिक व इतर कचरा हटवून नदी स्वच्छ करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करण्यात आले. या उपक्रमामुळे नदी संवर्धनाबाबत जनजागृती होण्यासही मोठी मदत झाली.

या अभियानाचा शुभारंभ दादासाहेब गायकवाड सभागृहात करण्यात आला. जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.

यावेळी कुंभमेळा मंत्री नामदार गिरीश महाजन, नाशिक मध्यच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे, नाशिक महानगरपालिकेच्या महापौर हिमगौरी आडके, उपमहापौर विलास शिंदे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांनी पर्यावरण संवर्धनासाठी समाजाच्या सक्रिय सहभागाची आवश्यकता अधोरेखित केली. नदी, नाले आणि जलस्रोत स्वच्छ ठेवणे ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी असल्याचे मत व्यक्त करत त्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

विशेष म्हणजे, जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेतून काही दिवसांपूर्वी हजारो भाविकांच्या सहभागातून गोदावरी नदी स्वच्छता अभियान यशस्वीपणे राबविण्यात आले होते. त्यानंतर आता नंदिनी नदी स्वच्छता महाअभियानातून पर्यावरण संरक्षणासाठी व्यापक जनसहभागाचे दर्शन घडले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button