जैतापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात केवळ एकच डॉक्टर; रिक्त पद तातडीने भरण्याची मागणी

जैतापूर दि. ५ :- जैतापूर परिसरातील नागरिकांना आरोग्यसेवा पुरवणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्या दीड महिन्यापासून केवळ एकच वैद्यकीय अधिकारी कार्यरत असल्याने आरोग्यसेवेवर ताण निर्माण झाला आहे. सुमारे २० ते २५ किलोमीटर कार्यक्षेत्र असलेल्या या केंद्राअंतर्गत अनेक उपकेंद्रे व दुर्गम गावे येत असून, या भागासाठी अधिक वैद्यकीय मनुष्यबळाची गरज व्यक्त केली जात आहे.
यापूर्वी बॉण्डवर कार्यरत असलेले एक वैद्यकीय अधिकारी त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर येथून बदली होऊन गेले. मात्र त्यानंतर रिक्त झालेल्या पदावर अद्याप नवीन वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे संपूर्ण आरोग्य केंद्राची जबाबदारी सध्या एकाच डॉक्टरांवर पडली आहे.
सध्या कार्यरत असलेले वैद्यकीय अधिकारी प्रशासकीय कामकाज, नियमित रुग्णसेवा, लसीकरण मोहिमा, विविध उपकेंद्रांच्या भेटी तसेच आपत्कालीन परिस्थितीत रात्रंदिवस सेवा देत आहेत. त्यांच्या प्रयत्नांमुळे आरोग्य सेवा सुरू असली तरी एकाच डॉक्टरांवर असलेला अतिरिक्त ताण लक्षात घेता भविष्यात त्याचा परिणाम रुग्णसेवेवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
लवकरच पावसाळ्याला सुरुवात होत असून ग्रामीण भागात साथीचे आजार, ताप, सर्दी, डेंग्यू, मलेरिया आदी आजारांचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत जैतापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात किमान दोन वैद्यकीय अधिकारी कायमस्वरूपी कार्यरत असणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे मत आहे.
या आरोग्य केंद्राअंतर्गत डोंगर, साखर, पडवे, अनसुरे, जाणसी आदी उपकेंद्रांचा समावेश असून काही उपकेंद्रांतील कर्मचारी पदे देखील रिक्त असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य सेवेपुढील अडचणी अधिक गंभीर बनल्या आहेत.
स्थानिक ग्रामपंचायत आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या ही बाब निदर्शनास आली नाही का असा सवाल उपस्थित होत असून यासंदर्भात जिल्हा परिषद सदस्या सौ. सोनाली टुकरुल यांनी आपणाकडून प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले. रिक्त झालेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या जागी तात्काळ नवीन डॉक्टरांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी प्रशासनाकडे करण्यात आली असून लवकरच वैद्यकीय अधिकारी उपलब्ध होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, ही बाब आमदार किरण उर्फ भैया सामंत यांच्या निदर्शनासही आणून देण्यात आली असून प्रशासनाने या रिक्त पदाची तातडीने भरती करून जैतापूर परिसरातील नागरिकांना सक्षम आरोग्य सेवा उपलब्ध करून द्यावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
एकमेव वैद्यकीय अधिकारी कार्यरत असल्यामुळे त्यांच्यावर मोठा कामाचा ताण पडत असून त्याचा परिणाम आरोग्य सेवेच्या गुणवत्तेवर होऊ नये यासाठी दुसरे रिक्त पद तात्काळ भरावे, अशी जोरदार मागणी आता परिसरातून होत आहे.



