रत्नागिरी

मान्सूनसाठी देवरुख नगरपंचायत सज्ज; आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार

२४ तास कक्ष कार्यरत

देवरुख दि. ४ :- पावसाळा तोंडावर आल्याच्या पार्श्वभूमीवर देवरुख नगरपंचायतीमार्फत शहरात व्यापक मान्सून पूर्व कामे वेगाने करण्यात आली असून, संभाव्य आपत्तीचा सामना करण्यासाठी ‘आपत्ती व्यवस्थापन आराखडा’ अंतिम करण्यात आला आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी नगरपंचायत प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन कक्षाची स्थापना केली असून, कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना तातडीने मदत मिळावी यासाठी टोल फ्री 18002330157 आणि दूरध्वनी क्रमांक 02354 260146 जाहीर करण्यात आले आहेत.

शहरात मान्सून दरम्यान कोणतीही जीवित किंवा वित्तहानी होऊ नये, यासाठी विभागवार जबाबदारीचे वाटप करून चोख नियोजन केले आहे, अशी माहिती मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांनी दिली आहे.

योजनाबद्ध कामे आणि पूर्वतयारी

नालेसफाई व कीटकनाशक साठा: शहरातील प्रमुख नाले व गटारांची सफाई करण्यात आली असून, पावसाळ्यात आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक कीटकनाशकांचा साठा उपलब्ध करण्यात आला आहे.

पाणीपुरवठा व टीसीएल पावडर: नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा व्हावा यासाठी टीसीएल पावडरचा मुबलक साठा करण्यात आला आहे. तसेच सध्या धरणात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध आहे.

आपत्ती निवारण साहित्य: आपत्ती काळात तातडीने मदतीसाठी लाईफ जॅकेट, औषधे, ग्रास कटर, वुड कटर आणि फायर फायटर (अग्निशामक) वाहन सुस्थितीत ठेवण्यात आले आहे.

सुरक्षा आणि सर्वेक्षण

विद्युत पोल व झाडांच्या फांद्या: शहरातील सर्व विद्युत पोल सुरक्षित असल्याबाबत विद्युत विभागामार्फत सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. पथदीप पोलवर आलेल्या झाडांच्या फांद्या तोडण्यात आल्या आहेत. तसेच सार्वजनिक ठिकाणी झाडे पडल्यास ती तात्काळ हटवण्याच्या सूचना संबंधित विभागांना दिल्या आहेत.

धोकादायक इमारती व झाडे: शहरातील धोकादायक इमारतींचा सर्वे करून संबंधित धारकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. खाजगी जागा मालकांनाही रस्त्यावरील धोकादायक फांद्या तोडण्याबाबत सूचना दिल्या आहेत. आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ अन्वये धोकादायक झाडांबाबतची जाहीर नोटीस प्रसिद्ध करण्यात आली आहे.

रस्ते दुरुस्ती : पावसाळ्यात वाहतूक कोंडी किंवा अपघात होऊ नयेत म्हणून शहरातील मुख्य रस्ता असलेल्या ‘माणिक चौक ते चोरपऱ्या’ या दरम्यानचे सर्व खड्डे भरण्यात आले आहेत. यासोबतच देवरुख शहरातील अंतर्गत रस्ते आणि पर्शरामवाडी येथील रस्त्यांवरील खड्डे बुजवून रस्ते वाहतुकीसाठी सुरक्षित करण्यात आले आहेत.

‘आपत्ती मित्र’ आणि एनजीओ सहकार्य

अचानक येणाऱ्या संकटाचा सामना करण्यासाठी नगरपंचायतीने शहरातील जेसीबीधारक, वूड कटर (झाडे कापणारे), पोकलॅक्रेन पुरविणारे, रुग्णवाहिका सेवा पुरविणारे तसेच डॉक्टर्स जनरल प्रॅक्टीशनर्स आणि स्थानिक ‘आपत्ती मित्र’ व एनजीओ (स्वयंसेवी संस्था) यांची यादी तयार केली आहे. संकट समयी या सर्वांची तातडीने मदत घेतली जाणार आहे.

आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कामकाज सुलभ चालण्यासाठी नोडल अधिकारी म्हणून खालील अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

१. श्री. अभिजीत राणे (करनिर्धारण व प्रशासकीय अधिकारी) मो .क्र. 8624094080

२. श्री. आरिफ शेख (स्वच्छता निरीक्षक) मो.क्र. 8788648790

शहरात कुठेही पाणी भरल्यास, झाड पडल्यास किंवा इतर कोणतीही आपत्ती निर्माण झाल्यास नागरिकांनी घाबरून न जाता, नगरपंचायतीच्या अधिकृत टोल फ्री क्रमांकावर, दूरध्वनी क्रमांकावर अथवा नियुक्त नोडल अधिकाऱ्यांशी तातडीने संपर्क साधावा, असे आवाहन मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button