रत्नागिरी

चिपळूणची महिला वैद्यकीय अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

गर्भपाताच्या किटसाठी मागितली होती ४,५०० रुपयांची लाच!

चिपळूण दि. ४ : गर्भपात करण्यासाठी आवश्यक असणारे किट (गोळ्या) देण्यासाठी एका गरोदर महिलेकडे ४,५०० रुपयांची लाच मागून ती स्वीकारणाऱ्या उपजिल्हा रुग्णालय कामथे येथील वर्ग-१ च्या महिला वैद्यकीय अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे वैद्यकीय क्षेत्रात आणि सरकारी वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

उपजिल्हा रुग्णालय कामथे, ता. चिपळूण, येथे वैद्यकीय अधिकारी, वर्ग-१ या पदावर काम करणाऱ्या डॉ. कांचन शिरीष मदार (वय ४८ वर्षे, रा. पागमळा, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी.) असे या महिला अधिकाऱ्याचे नाव आहे.

या प्रकरणातील तक्रारदार महिला गरोदर होत्या आणि त्यांना गर्भपात करावयाचा होता. याकरिता त्यांनी आज, दिनांक ०३ जून २०२६ रोजी उपजिल्हा रुग्णालय कामथे येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. कांचन मदार यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान डॉ. मदार यांनी तक्रारदार महिलेला गर्भपातासाठी आवश्यक असणारे किट (गोळ्या) देण्यासाठी ४ ते ५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तक्रारदार महिलेची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रत्नागिरी यांच्याकडे तक्रार नोंदवली.

तक्रारदारांच्या अर्जानुसार, आज दिनांक ०३/०६/२०२६ रोजीच एसीबीच्या पथकाने पडताळणी केली असता, डॉ. कांचन मदार यांनी गर्भपाताच्या किटसाठी ४,५०० रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.

लाचेची रक्कम स्वीकारण्याचे मान्य करताच एसीबीच्या पथकाने तात्काळ सापळा रचला. डॉ. कांचन मदार यांनी तक्रारदार महिलेकडून ४,५०० रुपयांची लाचेची रक्कम त्यांच्या MH 08 AX 2618 या खाजगी चारचाकी वाहनात स्वीकारली. लाच स्वीकारताच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने पंचांसमक्ष त्यांना रंगेहात ताब्यात घेतले. याप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.

सदरची धडक कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील, अपर पोलीस अधीक्षक भागवत सोनावणे आणि सुहास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

रत्नागिरी एसीबीचे पोलीस उप अधीक्षक अविनाश पाटील यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक श्री. सुहास रोकडे, मच्छिद्र जाधव, सपोफौ उदय चांदणे, पोलीस हवालदार संजय वाघाटे, विशाल नलावडे, दिपक आंबेकर, श्रेया विचारे, पोलीस शिपाई हेमंत पवार, राजेश गावकर, महिला पोलीस शिपाई समिता क्षिरसागर आणि चालक पोलीस शिपाई प्रशांत कांबळे यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली.

अँटी करप्शन ब्युरोचे नागरिकांना आवाहन:

अँटी करप्शन ब्युरो, रत्नागिरी तर्फे नागरिकांना आवाहन करण्यात येते की, कोणताही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी (किंवा त्यांच्या वतीने कोणी खाजगी व्यक्ती) कामासाठी लाचेची मागणी करत असेल, तर खालील क्रमांकांवर संपर्क साधावा:

टोल फ्री क्रमांक (Toll Free No): 1064

टेलिफोन क्रमांक: 02352/222893

मोबाईल क्रमांक: 7588941247, 9870474535, 9067035910

व्हॉट्सॲप क्रमांक (Whatsapp No): 7038391064

ईमेल: acbratnagiri@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button