रत्नागिरी

रत्नागिरीतील माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांचा मुख्यमंत्र्यांना अभिनव प्रस्ताव : दिवाळीत राज्यभर शासनसमन्वयित ड्रोन शो आयोजित करण्याची मागणी

रत्नागिरी दि. २० :- रत्नागिरी नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष मिलिंद कृष्णकांत कीर यांनी मुख्यमंत्री व मुख्य सचिव यांना एक पत्र पाठवून राज्यभर दिवाळीच्या काळात शासनाच्यावतीने समन्वयित ड्रोन शो आणि फटाक्यांचे सादरीकरण आयोजित करण्याचा अभिनव प्रस्ताव मांडला आहे.

या उपक्रमाचा उद्देश सुरक्षितता, प्रदूषण नियंत्रण आणि स्थानिक सांस्कृतिक वारसा जतन करणे हा आहे.

मिलिंद कीर यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की,

 “अलीकडे चीनमधील छोंगछिंग येथे झालेला भव्य ड्रोन शो ऑनलाईन पाहिला. जगात ज्यांनी हजारो वर्षांपूर्वी फटाक्यांचा शोध लावला तोच चीन आता पर्यावरणपूरक आणि तंत्रज्ञानाधिष्ठित ड्रोन शोद्वारे आपला सांस्कृतिक वारसा साजरा करत आहे. महाराष्ट्रालाही या दिशेने पाऊल टाकावे.”

त्यांनी सुचविले आहे की, राज्यातील प्रत्येक प्रमुख शहरात आणि जिल्हा मुख्यालयात दरवर्षी शासनाच्यावतीने व्यावसायिक पद्धतीने ड्रोन शो व फटाक्यांचे संयोजन सादर करण्यात यावे, ज्यात त्या-त्या शहराचा स्थानिक वारसा, कला, सण आणि ऐतिहासिक वैशिष्ट्ये प्रदर्शित केली जावीत.

अशा नियोजनबद्ध कार्यक्रमांमुळे प्रदूषण कमी होईल, आवाज नियंत्रणात राहील आणि नागरिकांना सुरक्षित, भव्य आणि प्रेरणादायी उत्सव अनुभवता येईल, असे त्यांनी नमूद केले आहे.

हा उपक्रम पर्यावरण, सांस्कृतिक कार्य, पर्यटन आणि नगर विकास विभागांच्या समन्वयाने राबविण्याचा प्रस्ताव आहे.

पत्राच्या शेवटी त्यांनी मुख्यमंत्री आणि त्यांच्या टीमला दिवाळीच्या शुभेच्छा देत महाराष्ट्राला सुरक्षित, स्वच्छ आणि संस्कृतीप्रधान सणोत्सवाचे आदर्श उदाहरण बनविण्याची आशा व्यक्त केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button