रत्नागिरी

सौ. गोदूताई जांभेकर विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात साजरा

रत्नागिरी दि. २९ ऑगस्ट : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या सौ. गोदूताई जांभेकर विद्यालय, रत्नागिरी येथे गुरुवार, दिनांक २७ ऑगस्ट २०२६ रोजी रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात व आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेच्या मुख्याध्यापिका संजना तारी उपस्थित होत्या.

रक्षाबंधन हा भाऊ-बहीण यांच्यातील प्रेम, विश्वास, आपुलकी आणि परस्पर संरक्षणाची भावना दृढ करणारा सण आहे. या भावनेचा सुंदर संदेश विद्यार्थ्यांना मिळावा या उद्देशाने प्रशालेत रक्षाबंधनाचा विशेष उपक्रम आयोजित करण्यात आला.

यावेळी प्रशालेतील शिक्षिकांनी शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना प्रेमपूर्वक राखी बांधून स्नेहबंध दृढ केला. तसेच प्रशालेतील विद्यार्थिनींनी विद्यार्थ्यांना राखी बांधून परस्पर प्रेम, आपुलकी, सन्मान आणि एकमेकांच्या संरक्षणाची भावना जपण्याचे अभिवचन दिले.

राखी बांधताना विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. या उपक्रमातून केवळ भाऊ-बहीण यांच्यातील नातेच नव्हे, तर शाळेतील सर्व घटकांमध्ये स्नेह, बंधुभाव, सहकार्य आणि परस्पर आदर वाढविण्याचा संदेश देण्यात आला.

रक्षाबंधनाच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृती व परंपरांची ओळख होण्याबरोबरच नात्यांमधील प्रेम आणि जबाबदारीचे महत्त्व समजले. संपूर्ण कार्यक्रम खेळीमेळीच्या, आनंदी व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

या उपक्रमाच्या माध्यमातून प्रशालेत ‘राखीचा धागा जपूया, प्रेमाचा बंध दृढ करूया’ हा संदेश देण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button