रत्नागिरी

रत्नागिरी पोलिसांचा मोठा दणका! कर्कश सायलेन्सरवाले रडारवर

१० सायलेन्सर जप्त, हजारो रुपयांचा दंड!

रत्नागिरी दि. २८ ऑगस्ट :- शहरात सुधारित (मॉडिफाय) सायलेन्सर बसवून कर्णकर्कश आवाजात दुचाकी चालवणाऱ्या चालकांविरोधात रत्नागिरी शहर पोलिसांनी धडक मोहीम हाती घेतली आहे. या कारवाईदरम्यान पोलिसांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १० दुचाकींचे कर्णकर्कश आवाज करणारे सायलेन्सर जप्त केले असून संबंधितांकडून तब्बल २९ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.

शहरातील मुख्य रस्ते आणि अंतर्गत गल्ल्यांमध्ये काही दुचाकीस्वार मूळ सायलेन्सर काढून फटाक्यांसारखा किंवा मोठ्या आवाजाचा सायलेन्सर बसवून भरधाव गाड्या चालवत असल्याच्या तक्रारी नागरिकांमधून वारंवार येत होत्या. या आवाजामुळे ज्येष्ठ नागरिक, रुग्ण, लहान मुले आणि सामान्य पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता.

याची गंभीर दखल घेत रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने शहरातील विविध नाक्यांवर अचानक वाहन तपासणी मोहीम राबवली. यावेळी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १० मोटारसायकलींची तपासणी करून त्यांचे बेकायदेशीर सायलेन्सर जागीच काढून जप्त करण्यात आले. तसेच मोटार वाहन कायद्यानुसार चालकांवर दंडात्मक कारवाई करत २९ हजार रुपयांचा महसूल जमा करण्यात आला.

शहरात शांतता व वाहतूक शिस्त अबाधित ठेवण्यासाठी अशी कारवाई यापुढेही सातत्याने सुरू राहणार असून, दुचाकींमध्ये बेकायदेशीर बदल करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button