माने अभियांत्रिकी महाविद्यालयात संस्थापक रवींद्र माने यांचा वाढदिवस संपन्न

देवरुख दि. १७ ऑगस्ट :- प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्था आंबव संचलित राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये २८ वा वर्धापन दिन व संस्थाध्यक्ष माजी राज्यमंत्री रवींद्र माने यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
वाढदिवसानिमित्त माने यांनी जिल्ह्यातील प्रसिद्ध शिवक्षेत्र श्री मार्लेश्वर व आंबव ग्रामदैवता श्री कालीश्री देवीचे दर्शन व आशीर्वाद घेतलेवर ते माने अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये विविध कार्यक्रमांसाठी महाविद्यालयात आले तेव्हा प्राचार्य डॉ. महेश भागवत यांनी स्वागत केले.
संस्थाध्यक्ष माने यांचे ६८ व्या वाढदिवसानिमित्ताने अभिष्टचिंतन सोहळ्याला कार्याध्यक्ष सौ. नेहा माने सौ. जयश्री दळवी, विजय दळवी, संस्थेचे सीईओ प्रद्युम्न माने, सौ. ईशानी वाघ-माने प्राचार्य डॉ. महेश भागवत आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सर्व विभागप्रमुख तसेच अभियांत्रिकी महाविद्यालय व तंत्रनिकेतनच्या प्राध्यापक, कर्मचारी, व विद्यार्थ्यांकडून मा. माने यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.
आपले संस्कार व पिंड हा समाजकारणाचा असल्याने या भागाचा शैक्षणिक विकास व्हावा या उद्देशाने आपण १९९८ साली हे महाविद्यालय उभे केले. आज या महाविद्यालयामुळे भोवतालची परिस्थिती बदलली असून इथला विद्यार्थी इंजिनिअर बनून समाजाच्या उन्नतीसाठी हातभार लावत आहे याचा आम्हाला सर्वस्वी अभिमान आहे. असे प्रतिपादन माने यांनी बोलताना व्यक्त केले व सर्वांकडून मिळालेल्या प्रेम व विश्वासाबद्दल आभार व्यक्त केले.
या दिवसाचे निमित्त साधून महाविद्यालयामध्ये एन एस एस विभागाच्या वतीने रक्तदान शिबीर घेण्यात आले. या शिबिरात बहुसंख्य विद्यार्थी व कर्मचा-यानी रक्तदान केले. डेरवण येथील वालावलकर रुग्णालय रक्तपेढी व त्यांचे अधिकारी डॉ. वसंत शिंदे, डॉ. रवी अगरवाल तसेच जान्हवी घोरपडे, विद्येश जांगली यांच्या सहकार्याने हे शिबीर पार पडले.
कार्यक्रमात महाविद्यालयाची अंतिम वर्षातील पुरस्कार प्राप्त विद्यार्थिनी कात्यायनी जोशी हिचा गौरव करण्यात आला.



