रत्नागिरी

संगमेश्वर देवरुख मार्गावरील खड्डे भरण्याची बांधकाम विभागाची अनोखी पद्धत

तीन दिवस तीन ठिकाणी अडथळे उभारून एकेरी वाहतूक; एकेरी वाहतूक साठी परवानगी कोणाची; डांबरावर सिमेंटचे मिश्रण

संगमेश्वर दि. १७ ऑगस्ट ( प्रतिनिधी ):- संगमेश्वर देवरुख साखरपा कोल्हापूर हा राज्य मार्ग गेली सहा वर्षे सातत्याने चर्चेत असून याची दखल घ्यायला कोणालाही वेळ नाही अशी स्थिती आहे. गेली काही वर्षे सार्वजनिक बांधकाम विभागासाठी हा मार्ग म्हणजे केवळ निधी खर्च करण्याचे माध्यम बनला आहे. या मार्गावरून प्रवास करताना प्रत्येक टप्प्यात बांधकाम विभागाच्या कार्यपद्धतीचे वाहनचालकांकडून अक्षरश: वाभाडे काढले जात आहेत. सर्वाधिक विशेष बाब म्हणजे शुक्रवारी सिमेंटने हे खड्डे भरल्यावर तीन ठिकाणी दगड, झाडांचे बुंधे लावून मार्ग एकेरी करुन अपघात सदृश्य स्थिती निर्माण करुन ठेवल्याने ठेकेदार आणि बांधकाम विभागा बाबत तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

संगमेश्वर देवरुख मार्गावरील खड्डे भरण्याचे काम गेले काही दिवस सार्वजनिक बांधकाम विभागाने ठेकेदारा मार्फत हाती घेतलं आहे. हे खड्डे भरताना पावासाळ्यात वापरलं जाणारं डांबर न वापरता प्रथमच सिमेंट खडी, ग्रीटचा वापर केला जात आहे. डांबरी रस्त्यावरचे खड्डे सिमेंटने भरायला खरोखरच तांत्रिक दृष्टीने बांधकाम विभागाला परवानगी आहे कां ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शुक्रवारी सायंकाळ पर्यंत लोवले परिसरात तीन ठिकाणी सिमेंटने खड्डे भरले गेले. या सिमेंट वरून वाहने जावून नयेत म्हणजे लांबच्या लांब पट्ट्यावर दगड, झाडाचे बुंधे, फांद्या तोडून पसरण्यात आल्या. दोन बाजूला दोन धोक्याचे फलक लावले गेले.

शुक्रवारी भरलेले हे खड्डे आणि या ठिकाणी सुरु केलेली एकेरी वाहतूक आज तीन दिवस बेकायदेशीरपणे तशीच ठेवून ठेकेदार आणि अभियंते कामाच्या ठिकाणावरून गायब झाले आहेत. सिमेंट सुकण्यासाठी तीन दिवसांचा कालावधी लागतो कां ? तसेच तीन दिवस अशी एकेरी वाहतूक ठेवता येते कां ? यासाठी बांधकाम विभागाला रस्ते सुरक्षा विभागाची काही नियमावली असते की नाही ? असे एक ना अनेक प्रश्न वाहनचालकांनी उपस्थित केले आहेत. संगमेश्वर साखरपा राज्य मार्गाचा दर्जा राखता न येणं हे सार्वजनिक बांधकाम विभागाचे सर्वात मोठं अपयश आहे.

या वर्षी मे महिन्यात, गत वर्षी खड्डे पडलेल्या ठिकाणी जाडी खडी पसरून मजबुतीकरण करण्यात आले होते. यामुळे पावसाळ्यात हा मार्ग प्रवासासाठी निर्धोक असेल, असे बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी जाहीरपणे सांगितलं होतं. मात्र त्यांचा हा दावा फोल ठरला आणि पाऊस येण्यापूर्वी पुन्हा एकदा खड्डे पडायला सुरुवात झाली. जुन महिन्यात पाऊस थांबला होता त्यावेळी परत एकदा पूर्वीच्या खड्ड्यात तळात डांबर न टाकता वरच्यावर हॉट मिक्सचा माल पसरण्यात आला. हा सर्व माल त्यानंतर आलेल्या पहिल्या पावसात धुपून गेला आणि या रस्त्याची परिस्थिती गतवर्षी प्रमाणेच भयावह झाली आहे .

दरवर्षी या रस्त्यावर दुरुस्तीसाठी लाखो रुपये खर्च केले जात आहेत. मात्र काम दर्जेदार होत नसल्यामुळे आणि याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग गंभीर नसल्याने संगमेश्वर साखरपा राज्य मार्ग आता चेष्टेचा विषय बनला आहे. गेले तीन दिवस लोवले गावात तीन ठिकाणी रस्त्यावर अडथळे उभे करुन अपघात सदृश्य स्थिती निर्माण करणाऱ्या ठेकेदार आणि याला जबाबदार असणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिक्षक अभियंत्यांनी चौकशी करुन त्यांना योग्य ती समज देण्याची मागणी वाहनचालकांनी केली आहे.

संगमेश्वर देवरुख प्रवास नकोसा 

संगमेश्वर देवरुख या २५ मी. च्या प्रवासासाठी आता एक तासा पेक्षा अधिक वेळ लागत आहे. जागोजागी पडलेल्या खड्ड्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. यात कहर म्हणजे लोवले येथे तीन ठिकाणी सिमेंटने खड्डे भरुन गेले तीन दिवस याठिकाणी एकेरी वाहतूक करुन ठेकेदार गायब झाला आहे. आज सायंकाळ पर्यंत हे बेकायदेशीरपणे उभारलेले अडथळे दूर न केल्यास आम्ही जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना तातडीने कार्यवाही करण्याची विनंती करणार आहोत. संगमेश्वर साखरपा रसत्यावरील खड्डे वाहनचालकांना सवयीचे झाले आहेत असे बहुधा बांधकाम विभागाचे मत झाले असावे. लोकप्रतिनिधीनी या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देणं गरजेचं आहे .

—- रवींद्र हळबे माजी ग्रा. प. सदस्य शिवने ता. संगमेश्वर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button