रत्नागिरी

डॉ. चंद्रकांत यळगुडकर यांचा संगमेश्वर तालुका पत्रकार संघातर्फे सन्मान

‘रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा’ या ध्येयाने सर्वसामान्यांच्या सेवेत योगदान; पत्रकारांच्या वतीने कार्याची घेतली दखल

संगमेश्वर दि. १७ ऑगस्ट :- गेल्या चार दशकांहून अधिक काळ ‘रुग्णसेवा हीच खरी ईश्वरसेवा’ या भावनेने सर्वसामान्य रुग्णांची गेली ४३ वर्षे अविरत रुग्ण सेवा करणारे, ग्रामीण भागातील गरजू रुग्णांना माफक दरात उपचार देतानाच अनेक वेळा आर्थिक मदतीचा हात पुढे करणारे ज्येष्ठ वैद्यकीय व्यावसायिक डॉ. चंद्रकांत यळगुडकर यांचा संगमेश्वर तालुका पत्रकार संघातर्फे विशेष सन्मान करण्यात आला.यावेळी डॉक्टरांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ ज्येष्ठ पत्रकार अजित आंबेकर यांच्या हस्ते तर सन्मानचिन्ह, मानपत्र पत्रकार संघाचे अध्यक्ष सुरेश सप्रे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.हा सोहळा हॉटेल सनराईजच्या सभागृहात हा उत्साहात पार पडला.

या वेळी व्यासपीठावर पत्रकार संघाचे अध्यक्ष सुरेश सप्रे, डॉ. चंद्रकांत यळगुडकर, त्यांच्या पत्नी सौ. नेहा येळगुडकर, डॉ. यळगुडकर, बंधू डॉ. माधव यळगुडकर, त्यांच्या पत्नी सौ. मानसी तसेच ज्येष्ठ पत्रकार अजित आंबेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

संगमेश्वर तालुक्यातील पत्रकारांनी एकत्र येऊन एखाद्या डॉक्टरच्या कार्याची दखल घेत त्यांचा सन्मान करणे, हेच डॉ. यळगुडकर यांच्या चार दशकांच्या सेवाकार्याची व्याप्ती आणि लोकांच्या मनातील त्यांच्याविषयीचा आदर अधोरेखित करणारे आहे, असे यावेळी उपस्थितांनी सांगितले.

सुमारे चाळीस वर्षांपूर्वी कोळंबे येथे वैद्यकीय सेवेचा प्रारंभ करणाऱ्या डॉ. यळगुडकर यांनी त्या काळातील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ग्रामीण भागात रुग्णसेवा केली. त्यावेळी अनेक खेड्यांमध्ये रस्ते, वीज, दूरध्वनी यांसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध नव्हत्या. मोबाईल तर दूरचीच गोष्ट होती. अशा परिस्थितीत रात्री-अपरात्री मोटारसायकलवरून शक्य तितक्या अंतरापर्यंत जाऊन, पुढे पावसात, चिखलातून वाट काढत ते रुग्णांच्या घरी पोहोचत आणि कोणतीही अपेक्षा न ठेवता उपचार करीत.कोळंबेनंतर कडवई, देवरूख आणि संगमेश्वर येथेही त्यांनी आपली वैद्यकीय सेवा सुरू केली. रुग्ण दवाखान्यात आल्यानंतर त्याच्याकडे उपचारासाठी पैसे आहेत की नाही, यापेक्षा प्रथम त्याच्यावर उपचार करणे याला त्यांनी नेहमीच प्राधान्य दिले.

गंभीर रुग्णाला स्वतःच्या मोटारसायकलवरून संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात घेऊन जाणे, पुढील उपचारासाठी किंवा प्रवासासाठी पैसे नसल्यास स्वतःच्या खिशातून आर्थिक मदत करणे, अशा अनेक प्रसंगांतून डॉ. यळगुडकर यांनी माणुसकीची सेवा जपली.संगमेश्वर तालुक्यात सुमारे चार दशकांपूर्वी पहिली रुग्णवाहिका घेण्याचा पुढाकारही डॉ. यळगुडकर यांनी घेतला. रुग्णवाहिका घेतल्यानंतर स्वतः वाहन चालवत त्यांनी संपूर्ण तालुक्यात ‘फिरता दवाखाना’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणली. दुर्गम भागातील रुग्णांपर्यंत वैद्यकीय सेवा पोहोचविण्याचे काम त्यांनी त्या काळात केले. आज वैद्यकीय क्षेत्राकडे पाहण्याचा दृष्टिकोन अनेक कारणांमुळे बदलला असला, तरी पैशापेक्षा रुग्णाच्या जीवाला प्राधान्य देणाऱ्या डॉ. यळगुडकर यांचे कार्य या क्षेत्रासाठी आदर्शवत असल्याचे उपस्थितांनी नमूद केले.

पत्रकार समीर सप्रे, संगमेश्वर तालुका पत्रकार संघाचे सचिव जे. डी. पराडकर, सहदेव बेटकर, पत्रकार मिलिंद चव्हाण, श्रीकृष्ण खातू आदींनी डॉ. यळगुडकर यांच्या कार्याविषयी मनोगतं व्यक्त केली .

डॉक्टरांना फोन केल्यानंतर कोणतीही अपेक्षा न ठेवता केलेली मदत, एखाद्या रुग्णाचा जीव वाचविण्यासाठी घेतलेली धडपड, रुग्णाला घरी जाण्यासाठी वाहनाची व्यवस्था करण्यासाठी स्वतःच्या खिशातून केलेली मदत, अशा अनेक आठवणी यावेळी उपस्थितांनी सांगितल्या. या अनुभवांतून डॉ. यळगुडकर यांच्या सेवाभावी वृत्तीचे दर्शन घडले.कुटुंबीयांच्या वतीने बोलताना त्यांच्या भगिनी सौ.माया गोखले यांनी भावनिक आठवण सांगितली. “तुम्ही सर्व भाग्यवान आहात. डॉक्टरांनी आपल्या व्यवसायाला आणि रुग्णसेवेला सर्वाधिक वेळ दिला; मात्र त्यांनी आम्हा कुटुंबाला कधीच पुरेसा वेळ दिला नाही,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली. मात्र, “तुम्ही त्यांच्यावर असेच प्रेम करीत राहा,” असे आवाहनही त्यांनी उपस्थितांना केले. सत्काराला उत्तर देताना डॉ. चंद्रकांत यळगुडकर यांनी आपल्या चार दशकांच्या कार्याचे संपूर्ण श्रेय पत्नी सौ. नेहा यळगुडकर यांना दिले. “त्या माझ्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. त्यांच्या पाठिंब्यामुळेच मी आजपर्यंत हे कार्य करू शकलो,” असे सांगताना त्यांनी पत्नीविषयी अभिमान व्यक्त केला.वैद्यकीय सेवेसोबतच डॉ. येळगुटकर हे सामाजिक कार्यातही सक्रिय असून कडवई येथील एका शैक्षणिक संस्थेचे अध्यक्षपदही ते सांभाळत आहेत.या सन्मान सोहळ्यासाठी व्यापारी, सामाजिक क्षेत्रात कार्यरत व्यक्ती, विविध मान्यवर तसेच डॉ. यळगुडकर यांच्यावर प्रेम करणारे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाची प्रस्तावना पत्रकार अमृत जाधव यांनी केली, तर सूत्रसंचालन श्रीकृष्ण खातू गुरुजी यांनीछान कविता करत केले.यावेळी विषेश उपस्थिती लाभाली ती डॉक्टर यांचे पुतणे डॉ, गणेश यळगुडकर, त्यांची मोठी भगिनी सौ. मीरा कुलकर्णी, त्यांचा मुलगा डॉ, विशाल आणि त्यांची पत्नी सौ, प्राजक्ता कुलकर्णी यांच्या सह संगमेश्वर तालुका पत्रकार संघाचे पदाधिकारी, सदस्य तसेच तालुक्यातील पत्रकार बांधव यावेळी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button