रत्नागिरी

कोकणातील गणेशोत्सवासाठी एस.टी.चा विशेष आराखडा तयार करण्यात यावा

खासदार नारायण राणे यांच्याकडे मागणी, सकारात्मक प्रतिसाद

रत्नागिरी दि. १६ ऑगस्ट : कोकणचा जिव्हाळ्याचा सण असलेल्या गणेशोत्सव २०२६ च्या पार्श्वभूमीवर चाकरमान्यांची गैरसोय टाळण्यासाठी आणि एस.टी. महामंडळाचे नुकसान रोखण्यासाठी विशेष वाहतूक आराखडा तयार करण्याची मागणी खासदार श्री. नारायण राणे यांच्याकडे करण्यात आली आहे.

याबाबतचे निवेदन तालुकाध्यक्ष श्री. प्रतीक देसाई यांनी खासदार राणे साहेबांची भेट घेऊन सादर केले. यावेळी त्यांनी निवेदनातील गांभीर्य समजावून सांगितले. त्यावर सकारात्मक प्रतिसाद देत खासदार राणे साहेबांनी सदर विषय परिवहन मंत्र्यांकडे मांडून यात नक्की बदल घडवून आणू, असे आश्वासन दिले आहे.

काय आहे मागणी?

दरवर्षी गणेशोत्सव काळात मुंबई, ठाणे, पुणे, नाशिकसह राज्यभरातून लाखो चाकरमानी रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यात येतात. यामुळे कोकणातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर प्रचंड ताण येतो.

सध्या गणपतीसाठी बाहेरून आलेल्या एस.टी. बसेस आगारात जमा करून चालक-वाहकांना परत पाठवले जाते आणि विसर्जनाच्या वेळी पुन्हा बोलावले जाते. यामुळे महामंडळावर प्रवास भत्ता, पगाराचा दुहेरी खर्च पडतो आणि ४-५ दिवस बसेस डिझेल भरून आगारातच उभ्या राहून उत्पन्न बुडते. त्याचवेळी मनुष्यबळाअभावी गावागावातील नियमित फेऱ्या रद्द करण्याची वेळ येते.

आषाढी-कार्तिकी वारीत ज्याप्रमाणे बाहेरून आलेल्या बसेसचा २-३ दिवस पंढरपूर परिसरात स्थानिक वाहतुकीसाठी वापर केला जातो, त्याच धर्तीवर गणेशोत्सव काळात कोकणात आलेल्या बसेस व चालक-वाहकांचा विसर्जनापर्यंत सलग ५ दिवस वापर करावा, अशी प्रमुख मागणी आहे.

प्रस्तावित कार्यपद्धती –

१. बाहेरून आलेल्या बसेस परतीपर्यंत विनावापर न ठेवता स्थानिक आणि लांब पल्ल्यासाठी वापराव्यात.

२. बाहेरील चालक-वाहकांना आगारातील विश्रामगृहात निवास देऊन सलग ५ दिवस सेवा घ्यावी.

३. स्थानिक रस्त्यांची माहिती नसलेल्या चालकांना लांब पल्ल्याच्या मार्गावर किंवा स्थानिक चालकाच्या मदतीने नियुक्त करावे.

४. यामुळे गावपातळीवरील नियमित फेऱ्या रद्द होणार नाहीत आणि ग्रामीण भागातील नागरिकांना खरेदी, दवाखाना, शासकीय कामांसाठी एस.टी. सेवा सुरळीत मिळेल.

या निर्णयामुळे एकीकडे चाकरमान्यांना सुरक्षित प्रवास मिळेल, स्थानिक नागरिकांची गैरसोय टळेल, महामंडळाच्या उत्पन्नात वाढ होऊन अनावश्यक खर्च वाचेल, तर दुसरीकडे सणासुदीच्या काळात रात्रंदिवस राबणाऱ्या कोकणातील एस.टी. कर्मचाऱ्यांनाही कुटुंबासोबत एक दिवस घालवता येईल.

कोकणच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर खासदार राणे साहेबांनी तातडीने लक्ष घालण्याचे आश्वासन दिल्याने चाकरमान्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button