जनता सहकारी बँक शाखा संगमेश्वर तर्फे २० ऑगस्ट रोजी माभळे येथे ग्राहक जागृती मेळावा

संगमेश्वर दि. १७ ऑगस्ट ( प्रतिनिधी ):- सध्या विविध प्रकारे सायबर भामटे ग्राहकांची फसवणूक करत असतात. यामुळे ग्राहकांचे खूप मोठे नुकसान होत असते . अनेक ग्राहकांची ऑनलाईन व्यवहार करताना अथवा अन्य प्रकारे फसवणूक होऊन आर्थिक नुकसान होत असतं . यालाच सायबर फ्रॉड असं म्हणलं जातं . अशा प्रकारच्या कोणत्याही सायबर फ्रॉड मध्ये एकही ग्राहक अडकू नये, यासाठी ग्राहकांची जनजागृती करण्याच्या हेतूने जनता सहकारी बँक पुणे, शाखा संगमेश्वरने ग्राहक जागृती मेळाव्याचे आयोजन केले असून या मेळाव्याला अधिकाधिक ग्राहकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन शाखाधिकारी विश्वास आठवले यांनी केले आहे.
अनेक वेळेस ग्राहकांनी योग्य ती काळजी, खबरदारी न घेतल्याने अशा घटना घडतात. यासाठी सायबर अधिक माहिती देण्याकरिता जनता बँकेने सर्व ग्राहकांसाठी मेळावा आयोजित केला असून सदर कार्यक्रमामध्ये सायबर फ्रॉडच्या संदर्भात तपशीलवार माहिती देण्यात येणार आहे. तरी अधिकाधिक ग्राहकांनी, यामध्ये ज्येष्ठ नागरीक, महिला तसेच आगामी काळात नव्याने खातं उघडणार आहेत, अशा तरुण वर्गाने देखील सदर मेळाव्याला आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन संगमेश्वरचे शाखाधिकारी विश्वास आठवले यांनी केलं आहे .जागरूकता हीच सुरक्षा, आपली सुरक्षितता हीच आमची प्राथमिकता असल्याचे आठवले यांनी नमूद केले. कार्यक्रम स्थळ – इंद्रधनू लॉज, माभळे, भिडे वाडी, संगमेश्वर वेळ – सायंकाळी ४ वा. अशी ठेवण्यात आली आहे.


