यांत्रिक व यंत्रचलित मासेमारी नौकांवर पावसाळी मासेमारी बंदीच्या कालावधीत वाढ; ही बंदी १ जून ते १५ ऑगस्टपर्यंत राहणार
राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री ना. नितेश राणे यांनी शासन आदेशाची विधानसभा सभागृहात दिली माहिती

मुंबई दि. २९ :- मान्सूनचे आगमन उशिरा होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या जलक्षेत्रात यांत्रिक व यंत्रचलित मासेमारी नौकांवर पावसाळी मासेमारी बंदीच्या कालावधीत वाढ करण्यात आली असून, आता ही बंदी १ जून ते १५ ऑगस्टपर्यंत करण्यात आली आहे. राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री ना. नितेश राणे यांनी शासन आदेशाची माहिती निवेदनाद्वारे आज विधानसभा सभागृहात दिली.
पश्चिम मान्सूनचे आगमन उशिरा होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, सध्या केंद्र शासनामार्फत पश्चिम किनारपट्टीवर १ जून ते ३१ जुलै (दोन्ही दिवस धरून) या कालावधीत राज्याच्या जलक्षेत्रात यांत्रिक व यंत्रचलित मासेमारी नौकांवर पावसाळी मासेमारी बंदी लागू आहे.
मात्र, मत्स्यसाठ्यांचे जतन व संवर्धन, माशांना प्रजननासाठी पुरेसा कालावधी मिळावा, भविष्यातील पिढ्यांसाठी मत्स्यसंपदा टिकून राहावी तसेच पावसाळ्याच्या सुरुवातीला निर्माण होणारे वादळी वारे, चक्रीवादळे, अवकाळी पाऊस आणि खराब हवामानामुळे मच्छीमारांच्या जीवित व वित्तहानीचा धोका टाळण्यासाठी ही बंदी १ जून ते १५ ऑगस्टपर्यंत वाढविण्याच्या शासन आदेशाची माहिती निवेदनाद्वारे आज विधानसभा सभागृहात दिली.



