माणुसकीचा जिवंत आदर्श! तीन दिवसांपासून जखमी अवस्थेत पडलेल्या बैलाला दुष्यंत (दादू) पाथरे यांनी दिला जीवदानाचा आधार

जैतापूर दि. २८ (राजन लाड) : सागरी महामार्गावरील नाटे पोलीस स्टेशनजवळ काही दिवसांपूर्वी अज्ञात वाहनाच्या धडकेत एक बैल गंभीर जखमी झाला होता. धडकेनंतर हा बैल तब्बल तीन-चार दिवस रस्त्याच्या कडेला मरणासन्न अवस्थेत पडून होता. या काळात त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. अनेकांनी या घटनेबद्दल हळहळ व्यक्त केली; मात्र प्रत्यक्ष मदतीसाठी पुढे येणारे हात फारसे दिसले नाहीत.
मोकाट जनावरांमुळे होणारे अपघात, त्यात जखमी होणारे वाहनचालक आणि मुक्या जनावरांचा जीव धोक्यात येण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. हा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असतानाही त्यावर प्रभावी आणि कायमस्वरूपी उपाययोजना होण्याची गरज पुन्हा एकदा या घटनेच्या निमित्ताने अधोरेखित झाली.
अशा परिस्थितीत नाटे येथील सी लायन जिमचे संचालक व सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेले दुष्यंत उर्फ दादू पाथरे यांनी माणुसकीचे दर्शन घडवले. कुटुंबासह अक्कलकोट येथून परतल्यानंतर ही बाब त्यांच्या निदर्शनास आली. त्यांनी कोणाचीही वाट न पाहता तातडीने आपल्या सहकाऱ्यांशी संपर्क साधला आणि घटनास्थळी धाव घेतली.
जखमी बैलाची अवस्था अत्यंत गंभीर असल्याचे लक्षात येताच त्यांनी स्थानिक पशुवैद्यकीय डॉक्टरांना घटनास्थळी बोलावून प्रथमोपचार करून घेतले. त्यानंतर स्वतः टेम्पोची व्यवस्था करून मोठ्या काळजीपूर्वक त्या बैलाला रत्नागिरी येथील गोशाळेत पुढील उपचारासाठी दाखल केले. या कार्यात काही स्थानिक नागरिकांनीही मोलाचे सहकार्य करत सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले.
एखाद्या मुक्या प्राण्याच्या वेदना समजून घेत त्याच्या जीवासाठी स्वतः वेळ, श्रम आणि आर्थिक खर्च करण्याची तयारी दाखवणारे दुष्यंत (दादू) पाथरे यांचे हे कार्य खऱ्या अर्थाने प्रेरणादायी ठरले आहे. समाजात आजही संवेदनशीलता आणि माणुसकी जिवंत असल्याचा विश्वास त्यांच्या कृतीमुळे अधिक दृढ झाला आहे.
ही घटना केवळ एका बैलाला वाचविण्यापुरती मर्यादित नसून, समाजाने मुक्या प्राण्यांप्रती संवेदनशील राहण्याचा संदेश देणारी आहे. रस्त्यावर जखमी अवस्थेत एखादा प्राणी दिसल्यास केवळ व्हिडिओ किंवा फोटो काढून सोशल मीडियावर टाकण्याबरोबरच त्याला वेळेत मदत मिळवून देण्यासाठी पुढाकार घेणे ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी आहे.
या घटनेच्या निमित्ताने मोकाट जनावरांच्या प्रश्नावर प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था, लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांनी संयुक्तपणे काम करून प्रभावी उपाययोजना राबविण्याची गरज अधोरेखित झाली आहे. जनावरांसाठी सुरक्षित निवारा, त्यांच्या मालकांची जबाबदारी निश्चित करणे, तसेच अपघात टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणे ही काळाची गरज आहे.
दुष्यंत उर्फ दादू पाथरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दाखविलेली तत्परता, संवेदनशीलता आणि सामाजिक बांधिलकी ही समाजासाठी प्रेरणादायी असून, त्यांच्या या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. एका मुक्या जीवाला दिलेला हा जीवनाचा आधार म्हणजे माणुसकी अजूनही जिवंत असल्याची साक्षच म्हणावी लागेल.



