रत्नागिरी

नॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिवलमध्ये वरवडेतील कलाकारांच्या निसर्ग शॉर्ट फिल्मला सहाव्या क्रमांकाचे नामांकन

कोल्हापूर फेस्टिवलमध्ये मान्यवरांच्या हस्ते कलाकारांचा विशेष सन्मान!

गणपतीपुळे दि. २७ (वैभव पवार) :- रत्नागिरी तालुक्यातील माध्यमिक विद्यालय वरवडे भाग शाळा खंडाळा येथील मराठी विषयाचे शिक्षक एस. के. जाधव यांनी निर्मिती केलेल्या निसर्ग या शॉर्ट फिल्मला नॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये सहाव्या क्रमांकाचे नामांकन मिळाले.

शुक्रवारी २६ जून रोजी कोल्हापूर येथील राजश्री शाहू स्मारक भवन मध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या नॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिवल मध्ये निसर्ग शॉर्ट फिल्मचे निर्माता व लेखक एस. के. जाधव व त्यांचे सर्व कलाकार यांचा विशेष सन्मान ऑल इंडिया पॅंथर सेनेचे अध्यक्ष दीपकभाई केदार, अनिल म्हमाने, आरपीआयचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे व अन्य मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत मानाचा फेटा, मानपत्र, सन्मानचिन्ह आणि पुस्तके देऊन करण्यात आला.

नॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिवलसाठी जवळपास 860 हून अधिक शॉर्ट फिल्म प्राप्त झाल्या होत्या .त्यामध्ये आशय, विषय आणि लघुपटाचा दर्जा पाहून काही निवडक शॉर्ट फिल्मची पहिली नामांकन यादी जाहीर करण्यात आली .या पहिल्या यादीतील शॉर्ट फिल्म नामांकनामध्ये निसर्ग शॉर्ट फिल्म ला पहिल्या पंधरा मध्ये स्थान मिळताना सहाव्या क्रमांकाचे नामांकन मिळाले.

सध्या युट्युब वर विविध विषयांवर शॉर्ट फिल्म अपलोड केल्या जातात. त्यामध्ये मनोरंजनात्मक व प्रबोधनात्मक अशा विविध प्रकारच्या शॉर्ट फिल्म पाहायला मिळतात. मात्र ग्रामीण भागातील असे अनेक कलाकार आज आपली कला युट्युब चॅनेल च्या माध्यमातून जगासमोर सादर करताना दिसतात. त्यातूनच निसर्ग या शॉर्ट फिल्मचे निर्माते, लेखक आणि माध्यमिक विद्यालय वरवडे भाग शाळा खंडाळा येथे मराठी विषय शिक्षक म्हणून कार्यरत असलेले एस के जाधव सर यांनी सामाजिक संदेश देणारी देणाऱ्या लघुपटाची निर्मिती केली.

एस.के. जाधव सर यांना मुळातच क्रीडा, सांस्कृतिक आणि समाज प्रबोधनाची मोठी आवड आहे. या आवडीतूनच त्यांनी सामाजिक संदेश देणाऱ्या लघुपटाची निर्मिती केली आहे. एक उत्कृष्ट सूत्रसंचालक म्हणून ते ओळखले जातात. त्यांनी अनेक कार्यक्रमातून उत्कृष्ट सूत्रसंचालनातून आपल्या व्यक्तिमत्त्वाची छाप उमटवली आहे.

खंडाळा व वरवडे परिसरातील विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊन आपल्या समाजाची प्रगती करावी यासाठी ते कायम पणे मार्गदर्शन आणि धडपड करीत असतात. तसेच विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेने प्रभावित होऊन त्यांनी शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे काम हाती घेतले आहे . आपल्या शाळेतील आजी-माजी विद्यार्थ्यांना एकत्रित करून त्यांनी दोस्तीची दुनिया तसेच निसर्ग अशा दोन शॉर्ट फिल्म तयार केल्या. त्यातील निसर्ग नावाची शॉर्ट फिल्म नॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिवल साठी पात्र ठरली.

या शॉर्ट फिल्म मधून त्यांनी समाज प्रबोधनाचे उत्तम काम केले आहे. मागील युवासेना मुंबई आयोजित युवा शॉर्ट फिल्म फेस्टिवल मध्ये माझे कुटुंब माझे जबाबदारी या शॉर्ट फिल्मचा सहभाग त्यांनी नोंदवला होता. तसेच लेखक, दिग्दर्शक आणि कलाकार म्हणून त्यांनी स्वतः काम केले आहे . युट्युब चॅनलवर प्रसारित केलेल्या त्यांच्या दोन शॉर्ट फिल्म ना रसिकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला आहे.

भविष्यात समाजप्रबोधनाचे अनेक विषय घेऊन ते यूट्यूब चॅनेलवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यांच्या शॉर्ट फिल्ममध्ये कलाकार म्हणून ते स्वतः आणि अन्य कलाकारांमध्ये विनू मेस्त्री, सुमित कांबळे, साहिल मोहिते, पंकज जाधव, अतुल सावंत, विशाल येलये, संदीप कनावजे, पार्थ माने, पौर्णिमा कीर, श्रद्धा सावंत तर कॅमेरा म्हणून विवेक जाधव व जयेश जाधव आदींचा समावेश आहे.

दरम्यान, कोल्हापूर येथील राजश्री शाहू भवन मध्ये झालेल्या नॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिवलमध्ये त्यांच्या निसर्ग शॉर्ट फिल्मला पहिल्या १५ मधील सहाव्या क्रमांकाचे नामांकन मिळाल्याने शॉर्ट फिल्मचे लेखक, निर्माते एस के जाधव सर व त्यांचे सर्व कलाकार यांचे खंडाळा व वरवडे परिसरातील सर्व स्तरातून विशेष अभिनंदन होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button