वरची निवेंडी प्राथमिक शाळेजवळील रस्त्याच्या कडेचा भाग धोकादायक स्थितीत
सार्वजनिक बांधकाम खात्याने लक्ष देण्याची गरज!

गणपतीपुळे दि. २६ (वैभव पवार) :- रत्नागिरी तालुक्यातील वरची निवेंडी ते चाफेकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर असलेल्या निवेंडी प्राथमिक शाळेजवळील आणि हनुमान मंदिराच्या समोरील रस्त्याच्या कडेचा भाग सध्या मोठ्या प्रमाणात खचल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे हा रस्ता वाहतूक आणि रहदारीसाठी धोकादायक स्थितीत दिसून येत आहे.
निवेंडी ते चाफेला जोडणारा हा मुख्य रस्ता सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत येतो. या मार्गावरून दररोज एसटीच्या गाड्या आणि इतर लहान मोठी खाजगी वाहने नियमित ये- जा करीत असतात. तसेच याच मुख्य रस्त्याच्या बाजूलाच निवेंडी येथील पूर्ण प्राथमिक शाळा असल्याने शाळेकरीता येणारे विद्यार्थी याच रस्त्यावरून ये -जा करीत असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांची दररोजची ये-जा लक्षात घेऊन रस्त्यावरून एखादे मोठे वाहन येत असल्यास या वाहनाला साईड देण्याच्या उद्देशाने विद्यार्थी रस्त्याच्या कडेने चालत असतात तसेच दोन्ही बाजू कडून वाहने आल्यास एकमेकाला साईट देताना संबंधित वाहनांना देखील रस्त्याचा दोन्ही भाग बघूनच वाहने चालवावी लागतात. परंतु सध्या येथील रस्त्याच्या कडेचा भाग खचला असल्याने वाहन चालकांसाठी देखील हा रस्ता धोकादायक बनला आहे.
तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहने आल्यात वाहन चालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. परंतु गेल्या अनेक दिवसांपासून या रस्त्याच्या कडेचा भाग खचलेल्या स्थितीत धोकादायक बनलेला असताना संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाचे या रस्त्याच्या धोकादायक स्थितीकडे कुठलेही लक्ष नसल्याने स्थानिक ग्रामस्थांमधून आश्चर्य व्यक्त केले जाते.तसेच दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात झाडे झुडपे वाढली आहेत परंतु ती देखील बांधकाम खात्याने पावसाळा सुरू झाला तरी तोडलेली नाहीत त्यामुळे रस्त्याची दुतर्फा स्थिती भयानक झाली आहे. या मुख्य रस्त्याच्या कडेचा भाग खचत असल्याने वाहतूक आणि रहदारीला धोका निर्माण झाला आहे.
याबाबत वरची निवेंडी येथील सामाजिक कार्यकर्ते उमेश कदम यांनी गांभीर्याने लक्ष घातले असून याबाबत संबंधित खात्याकडे योग्य तो पाठपुरावा करून सदर काम मार्गी लावण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. परंतु बांधकाम खात्याने या धोकादायक रस्त्याकडे गांभीर्याने आणि वेळीच लक्ष न दिल्यास आपण आंदोलनाचा देखील पवित्रा स्वीकारणार असल्याचे सांगितले आहे.

