माजी सैनिक शंकरराव मिलके यांचे दुःखद निधन; रत्नागिरीतील जलतरण क्षेत्रावर शोककळा

रत्नागिरी दि. २२ :- रत्नागिरीतील ज्येष्ठ माजी सैनिक तसेच प्रसिद्ध जलतरण प्रशिक्षक शंकरराव मिलके (मिलके सर) यांचे उपचारा दरम्यान दुःखद निधन झाले.
काही दिवसांपूर्वी त्यांना ब्रेन हॅमरेजचा धक्का बसला होता त्यांच्यावर पुणे येथील मिलिटरी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मात्र उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
शंकरराव मिलके यांनी आपल्या मिलके स्विमिंग अकॅडमीच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना समुद्रात पोहण्याचे प्रशिक्षण देत उत्कृष्ट जलतरणपटू घडवले. त्यांच्या शिस्तबद्ध प्रशिक्षणामुळे आणि विद्यार्थ्यांप्रती असलेल्या आत्मीयतेमुळे ते सर्वत्र”मिलके सर” या नावाने परिचित होते. रत्नागिरीतील जलतरण क्षेत्राच्या विकासात त्यांचे योगदान मोलाचे मानले जाते.
ते गेली अनेक वर्षे रत्नागिरी शहरातील किल्ला हनुमानवाडी येथे वास्तव्यास होते. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, दोन मुली, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
त्यांच्यावर आज रात्री उशिरा रत्नागिरी येथे अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती मिळाली आहे.
शंकरराव मिलके यांच्या निधनाने माजी सैनिक, क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत असून अनेकांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.


