Uncategorized

भागोजी शेठ कीर विधी महाविद्यालयात कथाकथन व कथालेखन या दोन दिवसीय कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद

रत्नागिरी दि. ५ ऑगस्ट : भागोजी शेठ कीर विधी महाविद्यालय येथे सांस्कृतिक विभागातर्फे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी, प्रभावी संवादकौशल्य, सर्जनशीलता आणि न्यायालयीन मांडणीची क्षमता विकसित करण्याच्या उद्देशाने ‘कथाकथन’ व ‘कथालेखन’ अशा दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या दोन्ही कार्यशाळांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी प्रसिद्ध लेखिका व कथाकथनकार सौ. सुनीता तांबे यांनी विद्यार्थ्यांना कथा शास्त्रशुद्ध पद्धतीने कशी मांडावी, तिची रचना कशी असावी आणि प्रभावी कथाकथनासाठी आवश्यक असलेले सूत्ररूपी मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांकडून प्रत्यक्ष कथाकथन करून घेत त्यांच्या सादरीकरणातील गुण-दोष स्पष्ट केले व आवश्यक मार्गदर्शन केले.

दुसऱ्या दिवशी आयोजित कथालेखन कार्यशाळेत त्यांनी कथालेखनाची संकल्पना, कथांचे विविध प्रकार, प्रभावी कथा लिहिण्याची तंत्रे आणि लेखनातील आवश्यक घटकांचे सविस्तर विवेचन केले. यावेळी विद्यार्थ्यांकडून प्रत्यक्ष कथालेखनाचा सराव करून घेत त्यांना कथालेखनासाठी उपयुक्त असे सूत्रही दिले. दोन्ही दिवस विद्यार्थ्यांनी तसेच प्राध्यापक वर्गाने देखील अत्यंत उत्साहाने कथाकथन व कथालेखनाच्या उपक्रमांमध्ये सहभाग नोंदविला.

कथालेखन कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आशिष बर्वे यांनी कायद्याच्या विद्यार्थ्यांसाठी कथाकथन आणि कथालेखन ही कौशल्ये किती महत्त्वाची आहेत, यावर मार्गदर्शन केले. न्यायालयीन युक्तिवाद, तथ्यांची प्रभावी मांडणी, केसचे विश्लेषण आणि संवादकौशल्य वृद्धिंगत करण्यासाठी या कौशल्यांचा मोठा उपयोग होतो, असे त्यांनी सांगितले.

या दोन दिवसीय कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांना सर्जनशील लेखन, प्रभावी अभिव्यक्ती आणि आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाची मौल्यवान संधी मिळाली. सहभागी विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेचे मनापासून स्वागत करत भविष्यातही अशा उपक्रमांचे आयोजन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

प्रास्ताविक प्राध्यापिका डॉ. संयोगिता सासने यांनी केले. स्वागत आणि सत्कार प्राध्यापिका तृप्ती देवरुखकर, सूत्रसंचालन प्राध्यापिका गौरी शेवडे तर आभार प्रदर्शन प्राध्यापिका धनश्री कदम यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button