
मालगुंड दि. ५ :- स्वयंभु श्री दुबळेश्वर महादेव मंदिर देवस्थान, मालगुंड, रत्नागिरीतर्फे जिल्हा परिषदेच्या १३ शाळेतील १२०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. सोमवारी १५ जून रोजी हा शालेय साहित्याचे वाटप कार्यक्रम होणार आहे.
शिक्षण हा कोणत्याही बालकाचा हक्क आहे आणि तो हक्क पूर्ण करण्यासाठी समाजाने, मंदिराने आणि प्रत्येक जागृत नागरिकाने पुढे येणे गरजेचे आहे. जेव्हा एखाद्या गरजू विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर हास्य फुलते, तेव्हांच भगवान दुबळेश्वर महादेवांचे सर्वात मोठे पूजन झाले असे समजावे.
सोमवार, दि. १५ जून रोजी सकाळी ११.०० वाजता मालगुंड तळेपाठ नंबर १ शाळेपासून सुरुवात करून सर्व शाळांमध्ये वाटप करण्यात येईल. यामध्ये मुलांना सहा वह्या, स्कूल बॅग, छत्री, वॉटर बॅग, पेन्सिल बॉक्स, फ्रुटी व चॉकलेट आणि इतर उपयुक्त वस्तूचे वाटप केले जाणार आहे.
या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन स्वयंभु श्री दुबळेश्वर महादेव मंदिर देवस्थान समितीच्या वतीने करण्यात आले आहे.



