मुंबई-गोवा महामार्गावर हातखंबा येथे चार वाहनांचा अपघात; एक गंभीर

रत्नागिरी दि. १९ : मुंबई-गोवा महामार्गावर हातखंबा येथे आज (१९ एप्रिल) पहाटे सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास चार वाहनांचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत एक जण गंभीर जखमी झाला.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, स्टीलने भरलेला ट्रक, आयशर टेम्पो, आंबा वाहतूक करणारी बोलेरो आणि एक कार अशी चार वाहने एकमेकांवर आदळली. अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की, वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
या अपघातात ट्रकमधील क्लिनर गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने रत्नागिरी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.
घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी ग्रामीण पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. बचावकार्य सुरू असून अडकलेल्या जखमींना बाहेर काढण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. दरम्यान, या अपघातामुळे काही काळ वाहतूकही विस्कळीत झाली होती. मुंबई-गोवा महामार्गावर वारंवार घडणाऱ्या अपघातांमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, प्रशासनाने तातडीने सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.



