‘मित्र’ च्या प्रयोगाने लक्ष्मी नारायण मंदिरातील उत्सवाची सांगता

संगमेश्वर दि. २८ ( प्रतिनिधी ):- चिपळूणातील श्री लक्ष्मी नारायण मंदिरात मित्र हा नाट्य प्रयोग झाला.या नाट्य प्रयोगाने या मंदिरातील रामनवमी उत्सवाची सांगता झाली.श्री लक्ष्मी नारायण देवस्थान नाट्य समाज यांनी डॉ.गिरीष आठवले यांनी लिहिलेल्या दोन अंकी नाट्य प्रयोग सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली.याचे दिग्दर्शन जयंतरावं चितळे यांनी केले होते.तर निशिकांत कानिटकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
नाट्य प्रयोगाच्या सादरीकरणात,अतिशय कमी जागेत नेपथ्य व रंगमंच व्यवस्था अतिशय प्रभावी करण्यात आली होती.ही व्यवस्था सुहास खरे आणि पार्टी यांनी केली होती. अनिल सोमण यांनी दादासाहेब पुरोहितांची भूमिका वठवली.तर मिसेस रुपवते यांची सौ सीमा रानडे यांनी केलेली भूमिका लक्षवेधी ठरली.या नाट्य प्रयोगात निरंजन केतकर,मेधा केतकर,डॉ माधव सोमण,विपुल गोगटे यांनी विविध भूमिका साकारल्या.या नाटकाचे रंगभूषा व पार्श्वसंगीत शशी पेंडसे यांनी तर प्रकाश योजना उदय पोटे यांनी पाहिली.
दिवसेंदिवस गावागावातील स्थलांतरण, वेळेचा अभाव, यामुळे अनेक नाट्य मंडळांच्या वार्षिकोत्सवात सादर होणाऱ्या नाट्य प्रयोगांच्या वर्षानुवर्षांच्या परंपरा बंद पडत चालल्या आहेत.यातच श्री लक्ष्मी नारायण देवस्थान नाट्य समाज चिपळूण आपली नाटकाची परंपरा अखंडित चालू ठेवण्याचा यशस्वी प्रयत्न करताना दिसत आहे.लक्ष्मी नारायण मंदिरात राम जन्मोत्सवाचा उत्सव मोठ्या थाटामातात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमानी साजरा झाला. विविध कार्यक्रमाना हजारोंच्या संख्येने भाविकांनी हजेरी लावली. देवस्थानचे अध्यक्ष ॲड मकरंद साठे यांनी साऱ्यांचे आभार मानले.



