
रत्नागिरी दि. १९ : कुवारबाव येथील श्री महालक्ष्मी मंडळ मैदानावर आयोजित विशाल हिंदू संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. कुवारबाव, खेडशी, कारवांचीवाडी, मिरजोळे, गणेशनगर, साईनगर, पोमेंडी परिसरातील हजारो हिंदू बंधू-भगिनींच्या उपस्थितीमुळे संमेलनस्थळी उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

संमेलनाची सुरुवात काजरघाटी येथील ढोल-ताशा पथकाच्या गजरात झाली. पारंपरिक वेशभूषेतील विद्यार्थी व महिलांनी भगवे ध्वज फडकावत भव्य प्रवेश केला. हिंदू जनजागृती समितीच्या वतीने युवतींनी लाठी-काठीचे प्रात्यक्षिक सादर केले. पोमेंडी खुर्द येथील जि. प. शाळेतील विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवरायांवरील आरती व हिंदुत्व गीतावर नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
इस्कॉनचे निमाईचंद्र दास यांनी अर्जुन-श्रीकृष्ण संवादातून कर्तव्य, धर्म आणि जीवनमूल्यांवर प्रभावी प्रबोधन केले. क्रीडा भारतीच्या कार्यकर्त्या सौ. नेत्रा राजेशिर्के यांनी ‘पंचपरिवर्तन’ विषयावर मार्गदर्शन करत, समाजपरिवर्तनाची सुरुवात स्वतःपासून करण्याचे आवाहन केले. समरसता, कुटुंब प्रबोधन, स्वभाषा, स्वभूषा, स्वभोजन, पर्यावरण संरक्षण, जलसंरक्षण व वृक्षारोपण या कृतींची अंमलबजावणी आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले
रा. स्व. संघाचे कोकण प्रांत कार्यवाह विठ्ठल कांबळे यांनी हिंदू परंपरांचे महत्त्व अधोरेखित करत, “हिंदुत्व म्हणजे मानवता धर्म” हा संतांचा संदेश पुन्हा जागवण्याची गरज व्यक्त केली. मेकॉले शिक्षणपद्धतीमुळे भारतीय ज्ञानपरंपरेबद्दल न्यूनगंड निर्माण झाल्याचे त्यांनी नमूद केले. जात-पात पलीकडे जाऊन समाज एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी केले.
प्रशांत कदम यांनी हिंदू समाजासमोरील आंतरिक आव्हानांवर भाष्य करत, समाज एकत्र येण्याची गरज अधोरेखित केली. रत्नागिरी व नाशिक येथील काही घटनांचा दाखला देत त्यांनी सामाजिक व लोकसंख्यात्मक बदलांविषयी चिंता व्यक्त केली. रत्नागिरीत घडलेल्या लव्ह जिहाद प्रकरणांची माहिती त्यांनी सांगितली.
संमेलनाचे कोषाध्यक्ष वरदराज पंडित यांनी प्रास्ताविकात सनातन हिंदू धर्माचे जागतिक महत्त्व अधोरेखित केले. वैचारिक व सांस्कृतिक आव्हानांना तोंड देण्यासाठी हिंदूंनी एकत्र येणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. जागरण, एकत्रीकरण व सशक्तीकरण या उद्देशाने संमेलनाचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.
सूत्रसंचालन सौ. कीर्ती मोडक यांनी केले. संयोजक मारुती आंब्रे यांनी संमेलनामुळे पंचक्रोशीत हिंदू एकतेला बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त करून सर्वांचे आभार मानले.



