देवरुख शहरात उघड्या गटारांचे साम्राज्य; ‘डासमुक्तीचे’ मोठे आव्हान

देवरुख दि. २८ :- देवरुख नगरपंचायतीने शहराला ‘डासमुक्त’ करण्याचा महत्त्वाकांक्षी संकल्प सोडला असला, तरी प्रत्यक्षात शहरातील प्रमुख रस्त्यांवर उघड्या आणि तुंबलेल्या गटारांमुळे या मोहिमेचा फज्जा उडण्याची शक्यता असल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शहराच्या अनेक भागांत गटारांची अवस्था अत्यंत बिकट असून, परिसरात पसरलेल्या दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
शहरातील मुख्य रस्त्यांच्या कडेला असलेल्या गटारांची नियमित साफसफाई होत नसल्याने त्यामध्ये सांडपाणी साचून राहते. या साचलेल्या पाण्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. अनेक ठिकाणी पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालताना नाकाला रुमाल लावूनच प्रवास करावा लागतो. विशेषतः बाजारपेठ आणि वर्दळीच्या ठिकाणांवर ही समस्या अधिक गंभीर बनली आहे.
अवघ्या दोन दिवसांपूर्वी देवरुख नगरपंचायतीने शहर डासमुक्त करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. यासाठी नवीन फॉगिंग मशिन, कीटकनाशक फवारणी आणि विविध जनजागृतीपर उपक्रम हाती घेण्याचे जाहीर करण्यात आले. मात्र, एका बाजूला प्रशासन डासमुक्तीच्या गप्पा मारत असताना, दुसऱ्या बाजूला शहरातील उघडी गटारे डासांची उत्पत्ती केंद्र बनली आहेत. साचलेल्या पाण्यामुळे डासांचे प्रमाण कमालीचे वाढले असून नागरिकांच्या घरातही आता डासांचा वावर वाढला आहे.अनेक प्रभागांत गटारे उघडी असून त्याला व्यवस्थित उतार काढला नसल्याने त्यामध्ये कचरा अडकून पाणी तुंबते.
त्यामुळे डासांची उत्पत्ती वाढत असल्यामुळे डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांची भीती व्यक्त होत आहे.केवळ मशिनरी आणून उपयोग नाही, तर मुळातील अस्वच्छता दूर करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
नगरपंचायतीने उपक्रम हाती घेणे कौतुकास्पद आहे, पण जोपर्यंत गटारांची स्वच्छता आणि दुरुस्ती व्यवस्थित होत नाही, तोपर्यंत डासमुक्ती शक्य नाही,अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांकडून उमटत आहे.आता नगरपंचायत प्रशासन केवळ कागदावर संकल्प सोडणार की प्रत्यक्ष जमिनीवर उतरून उघड्या गटारांची ही समस्या कायमची मार्गी लावणार, याकडे संपूर्ण देवरुखवासीयांचे लक्ष लागले आहे.



