थिबाराजा कालीन बुद्धविहाराबाबत दिशाभूल करण्याचे काम
थिबाराजा चॅरिटेबल ट्रस्टचा आरोप; कम्युनिटी सेंटर नसून बुद्धविहारच होणार

रत्नागिरी दि. १८ : जिल्हा शासकीय रुग्णालयासमोर ड़ॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री उदय सामंत यांनी थिबा राजा कालिन बुद्धविहार जागेत कम्युनिटी सेंटर नसून बुद्धविहारच बांधणार असल्याचे सांगितले, असे असतानाही सामंत सभेतून गेल्यानंतर त्याठिकाणी काही मंडळींनी सभा मंचावरून बुद्धविहार नसून कम्युनिटी सेंटर बांधण्यात येत आहे, अशा प्रकारे समाजाची दिशाभूल करण्याचे काम केले, असा आरोप थिबाराजा कालीन बुद्धविहार स्थळविकास चॅरिटेबल ट्रस्टचे उपाध्यक्ष मारुती कांबळे यांनी केला आहे.
शहातील माळनाका येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत कांबळे बोलत होते. शासकीय नियमांनुसार ‘बुद्धविहार’ या नावाने थेट निधी उपलब्ध करून देण्याची तरतूद नसल्याने, प्रशासकीय स्तरावर तो निधी ‘कम्युनिटी सेंटर’ या शीर्षकाखाली मंजूर करण्यात आला आहे. केवळ निधी मिळवण्यासाठी हा शब्दप्रयोग तांत्रिकदृष्ट्या वापरला असला, तरी प्रत्यक्षात उभी राहणारी वास्तू ही पूर्णत बुद्धविहारच असणार आहे, असे कांबळे यांनी स्पष्ट केले.
समाजातील काही ठराविक गट ही वास्तू बुद्धविहार नसून केवळ ‘कम्युनिटी सेंटर‘ असल्याचे सांगून समाजात गैरसमज पसरवत आहेत. या अफवांच्या आधारे मोर्चे काढले जात असून, यामुळे सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न होत आहे. तांत्रिक शब्दांचा विपर्यास करून पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन कांबळे यांनी केले.
सिद्धार्थ पॅलेस प्रोजेक्टच्या नावाने फसवणूक
भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखेने २००२-०३ साली निवळी येथील ग्रामस्थांची ४ एकर जागा सिद्धार्थ पॅलेस प्रोजेक्टच्या बहाण्याने नावावर करून घेतली होती. त्यावेळी निवळी ग्रामस्थांना त्याजागेचा विकास करून स्थानिकांना रोजगार देण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. २० वर्षांहून अधिक काळ ही जागा भारतीय बौद्ध महासभेच्या ताब्यात असताना देखील तशीच पडून राहिली आहे. जागेजा कोणताही विकास न करता केवळ ग्रामस्थांची फसवणूक करण्याचे काम झाले आहे. आता हे लोक थिबाकालीन बुद्धविहाराची जागा ताब्यात घेवून विकास करण्याचे आश्वासन समाजाला कोणत्या आधारावर देत आहेत असा प्रश्न ॲड. शिवराज जाधव यांनी पत्रकार परिषदेत केला.
या पत्रकार परिषदेला जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती सुयोग कांबळे, सुहास कांबळे, कायदेशीर सल्लागार ॲड. शिवराज जाधव, कोषाध्यक्ष प्रीतम आयरे यांच्यासह शशिकांत कांबळे, सुनील कांबळे, मिलिंद कांबळे, समीर जाधव, राहुल सावंत, नरेश कांबळे, तुषार पवार, किरण पवार आणि सुरेश सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.



