विधी प्रवेश प्रक्रियेसाठी र. ए. सोसायटीचे श्रीमान भागोजीशेठ कीर महाविद्यालय CET पोर्टल वर उपलब्ध!

रत्नागिरी दि. १४ ऑगस्ट : सध्या सीईटी सेल मार्फत ३ वर्षीय व ५ वर्षीय विधी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीचा फेरी CET सेल मार्फत सुरू आहे. त्यात आणखी मुदतवाढ किंवा नव्याने वेळापत्रक मिळण्याची शक्यता आहे. यात रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे श्रीमान भागोजीशेठ कीर विधी महाविद्यालय विद्यार्थ्यांना कॉलेज ऑप्शन फॉर्ममध्ये दिसू लागले आहे, त्यामुळे आता कोकणातील विद्यार्थ्याना प्रवेश घेता येईल, अशी माहिती रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह सतीश शेवडे यांनी दिली.
आनंदाची बाब म्हणजे महाविद्यालयाला बार कौन्सिल ऑफ इंडियाचे 2026-27 शैक्षणिक वर्षाचे Approval सुद्धा मिळाले आहे.
रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी स्वतः केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन मेघवाल यांची भेट घेऊन यासाठी प्रयत्न केले.
श्रीमान भागीजीशेठ कीर महाविद्यालयाने १ मार्च २०२६ रोजी (म्हणजेच बार कौन्सिल ऑफ इंडियाने विहित केलेल्या मुदतीत) आवश्यक शुल्कासह बार कौन्सिल ऑफ इंडियाकडे Online Application केले होते व दिनांक 12 ऑगस्ट 2026 चे पत्रान्वये बार कौन्सिलने महाविद्यालयाला Approval प्रदान केले आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी व कॉलेज व्यवस्थापन यांनी आवश्यक ती सर्व कार्यवाही केलेली असून आता सीईटी सेल, उच्च शिक्षण विभाग यांच्या वेबसाइट वरती महाविद्यालयाची माहिती (प्रोफाईल) स्वीकारून ती मंजूर झाली आहे आणि या वर्षीच्या ३ वर्षीय अभ्यासक्रम आणि बीए, एलएलबी- ५ वर्षीय अभ्यासक्रमांसाठी महाविद्यालय CET पोर्टल वरती दिसत असून विद्यार्थ्यांना आपले महाविद्यालय निवडता येईल, तेव्हा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी यासाठी प्रवेश घ्यावा, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.



