रत्नागिरी

रत्नागिरीत सिंचन विभागातील कार्यकारी अभियंता, लिपिकाला २ लाखांची लाच घेताना अटक

रत्नागिरी दि. २८ : कपात केलेली देयकाची रक्कम परत मिळवून देण्यासाठी दोन लाख रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या रत्नागिरी पाटबंधारे विभागातील कार्यकारी अभियंत्यासह एका कनिष्ठ लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे सरकारी महसूल आणि सिंचन विभागात मोठी खळबळ उडाली असून गणेश हरीदास सलगार (वय ३६, कार्यकारी अभियंता, वर्ग १) आणि शेखर चंद्रमणी पवार (वय ३१, कनिष्ठ लिपिक टंकलेखक, वर्ग ३) अशी ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत.

तक्रारदार यांचा ‘शिवकृपा कन्स्ट्रक्शन’ नावाचा व्यवसाय असून त्यांना मंडणगड तालुक्यातील भोळवली येथील धरण गळती रोखण्यासाठी मातीकामाचे कार्यारंभ आदेश रत्नागिरी पाटबंधारे विभागाकडून मिळाले होते.

हे काम पूर्ण झाल्यानंतर तक्रारदार यांची दोन देयके अदा करण्यात आली होती, मात्र तिसऱ्या आणि अंतिम देयकातून ११,३०,८९३ रुपयांची रक्कम कपात करण्यात आली होती. ही कपात केलेली रक्कम परत मिळवून देण्यासाठी तक्रारदार यांनी १८ मार्च २०२६ रोजी कार्यकारी अभियंता गणेश सलगार यांची भेट घेतली असता, त्यांनी ३,४०,००० रुपयांच्या लाचेची मागणी केली. यानंतर तक्रारदाराने २७ मार्च २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रत्नागिरी येथे लेखी तक्रार नोंदवली.

एसीबीने त्याच दिवशी पडताळणी केली असता, तडजोडीअंती २,००,००० रुपये स्वीकारण्याचे ठरले.

मुख्य आरोपी गणेश सलगार यांनी लाचेची रक्कम कनिष्ठ लिपिक शेखर पवार याच्याकडे देण्यास सांगितले आणि सलगार यांच्या सांगण्यावरून पवार याने ही रक्कम स्वीकारताच दबा धरून बसलेल्या एसीबी पथकाने दोघांनाही ताब्यात घेतले सध्या रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील, अपर पोलीस अधीक्षक भागवत सोनावणे आणि रत्नागिरी एसीबीचे उप अधीक्षक अविनाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मच्छिंद्र जाधव व त्यांच्या पथकाने केली आहे.

कोणताही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी लाचेची मागणी करत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रत्नागिरीच्या टोल फ्री क्रमांक १०६४ किंवा व्हॉट्सॲप क्रमांक ७०३८३९१०६४ वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button