रत्नागिरी

गॅस आणि पेट्रोल प्रश्नावर ग्राहक पंचायती सोबत जिल्हाधिकाऱ्यांची सकारात्मक चर्चा

रत्नागिरी दि. २७ :- सद्यस्थितीत सर्व पेट्रोल, डिझेल आणि गॅस इंधन पुरवठ्याबाबत नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या अनुषंगाने ग्राहक पंचायतीचे जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांची भेट घेतली. केंद्र आणि राज्यस्तरावरील प्राप्त निवेदनानुसार पुरेसा इंधन पुरवठा असल्याचे सांगण्यात येत असूनही ग्राहक पेट्रोलसाठी रांगा लावून असल्याची बाब निदर्शनास आणून देण्यात आली. या वेळी जिल्हाधिकाऱ्यांनी पेट्रोलियम कंपन्या पेट्रोल डिझेल पुरवतात, आणि त्यांच्या कडून साठा इत्यादी माहिती घेऊन तातडीने निवेदन देण्याचे मान्य केले आहे.

याच अनुषंगाने पेट्रोल पंपवर साठ्याबद्दल सुस्पष्ट फलक लावावेत आणि त्यावर वेळ नमूद करून प्रति तीन तासांनी त्या त्या वेळेची साठ्याची माहिती प्रदर्शित करावी अशी आग्रही मागणी ग्राहक पंचायतीने केली.

याचवेळी शासनाने यांत्रिक शेती उपकरणे मोठ्या अनुदानाने वितरित केली असून त्यांच्यासाठी इंधनाची गरज आहे. यासाठी शेतकऱ्यांना पुरेसे इंधन अखंड मिळण्याची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी केली, या बद्दल जिल्हाधिकारी यांनी ही बाब सध्याच्या बिकट परस्थिती मध्ये शक्य नसल्याचे सांगितले, परंतु ग्राहक पंचायत यांनी या बद्दल कृषी क्षेत्राचे नुकसान होत असून ते टाळण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून मार्ग काढण्याचे आवाहन केले.
सध्या गॅस वितरकांकडे ऑनलाईन बुकिंग प्रमाणे नोंदणी झाल्यावर देखील दीर्घकाळ गॅस सिलेंडर दिला जात नाही. या ऐवजी ग्राहकांना रिकामा सिलेंडर आणा आणि भरलेला घेऊन जा असे सांगण्यात येत आहे. घरपोच गॅस सिलिंडर वितरण होत नसल्याने अत्यंत धोकादायक परिस्थिती निर्माण झाली असून, रस्त्यांची कामे सुरू असताना, ग्राहक नाईलाजाने दुचाकी, चारचाकी, रिक्षा अशा असुरक्षित पद्धतीने भरलेले गॅस सिलेंडर नेत आहेत.या प्रवासात गंभीर अपघात होण्याचा धोका आहे, तसेच वितरक डिलिव्हरी साठी मिळणारे पैसे ग्राहकाला परत देत नाहीत अशी माहिती दिली व या साठी तत्काळ गॅस सिलेंडर सुरक्षित पद्धतीने घरपोच देण्यासाठी निर्देश द्यावे, तसेच ज्या ग्राहकांनी गॅस सिलेंडर वितरक यांच्याकडून नेले आहेत त्यांना वितरण खर्चाचा परतावा देण्याचे आदेश देण्यात यावे अशी मागणी केली आणि त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
रत्नागिरीत गॅसपाईप लाइन चालू आहे , काही भागातून गेली पण कनेक्शन दिली नाही ती प्राधान्याने लवकर देण्यात यावीत या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी संबंधित पाईप गॅस कंपनीकडे वस्तुस्थिती जाणून घेतली आणि तत्काळ पाईप गॅस साठी नव्याने ठेकदार नियुक्त करून वेगाने जास्तीत जास्त गॅस जोडण्या देण्याची कार्यवाही गतिमान केली आहे.

जिल्हाधिकारी यांनी अतिशय सकारात्मक आणि तत्काळ प्रतिसाद देत जिल्ह्यातील इंधन पुरवठ्याबाबत योग्य पद्धतीने, समक्ष निर्देश दिले असल्याने ग्राहक पंचायत अध्यक्ष संजय वैशंपायन यांनी तसेच शेतकरी अनंत भडकमकर, सदस्य संतोष गाडगीळ यांनी समाधान व्यक्त केले आहे.

ग्राहक पंचायत ग्राहकांच्या समस्या न्याय्य पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न सातत्याने करत आहे. ग्राहकांनी आपल्या समस्या ग्राहक पंचायत यांच्या निदर्शनास आणून देण्याचे आवाहन सदस्य दीपक राऊत यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button