रुपाली चाकणकर यांच्या विरोधात कारवाईची जिजाऊ ब्रिगेडची मागणी

रत्नागिरी दि. २५ :- महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी रत्नागिरी जिल्हा जिजाऊ ब्रिगेडतर्फे करण्यात आली आहे. अंधश्रद्धा प्रकरणात सहभाग तसेच खरात प्रकरणात सहआरोपी म्हणून त्यांना अटक करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
जिजाऊ ब्रिगेडने दिलेल्या निवेदनात राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत असताना महिला आयोगाकडून ठोस भूमिका घेतली जात नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील ढवळगिरी येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार, संगमनेर तालुक्यातील ऍसिड हल्ल्याची घटना तसेच कथित भोंदूबाबा प्रकरणाचा उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे.
सदर प्रकरणात महिलांच्या संरक्षणाची जबाबदारी असलेल्या महिला आयोगाच्या अध्यक्षा संबंधित व्यक्तींशी जोडल्या गेल्याचा आरोप करत या बाबत संताप व्यक्त करण्यात आला आहे. तसेच चाकणकर यांनी तात्काळ राजीनामा द्यावा व त्यांची पदावरून हकालपट्टी करावी, अन्यथा राज्यभर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
हे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले. यावेळी जिल्हा जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षा स्नेहल चव्हाण, तालुका उपाध्यक्षा वीणा जावकर, सामाजिक कार्यकर्त्या श्रुती जोशी व शिर्के मॅडम उपस्थित होत्या.



