राजापूर येथील आबासाहेब मराठे आर्टस् अॅन्ड न्यू कॉमर्स सायन्स कॉलेजच्या वाणिज्य विभागातील प्राध्यापकांचे संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय यश

राजापूर दि. २५ :- आबासाहेब मराठे आर्टस् अॅन्ड न्यू कॉमर्स सायन्स कॉलेज, राजापूर येथील वाणिज्य विभागातील प्राध्यापकांनी संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करत महाविद्यालयाच्या शैक्षणिक कामगिरीत आणखी भर घातली आहे. महाविद्यालयातील प्रा. प्रकाश कोंडसकर, प्रा. शैलेंद्र प्रभुदेसाई आणि प्रा. प्रणाली तळवडेकर यांनी विकसित केलेल्या कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित वित्तीय अंदाज उपकरणाला भारत सरकारच्या इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी इंडिया या बौद्धिक संपदा विभागाकडून पेटंट नोंदणी प्राप्त झाली असून ते अधिकृतरीत्या प्रकाशित करण्यात आले आहे. या यशामुळे महाविद्यालयाच्या संशोधन परंपरेला नवी दिशा मिळाली असून ग्रामीण भागातील महाविद्यालयातूनही नाविन्यपूर्ण संशोधन होऊ शकते हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
या संशोधनामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करून वित्तीय व्यवहारांचे विश्लेषण करण्यासाठी आधुनिक उपकरण विकसित करण्यात आले आहे. या उपकरणाच्या सहाय्याने भविष्यातील आर्थिक घडामोडींचा अंदाज वर्तविणे, संभाव्य जोखमींचे पूर्वनियोजन करणे तसेच वित्तीय नियोजन अधिक अचूकपणे करणे शक्य होणार आहे. उद्योग, व्यवसाय, बँकिंग क्षेत्र तसेच विविध वित्तीय संस्थांना आर्थिक निर्णय घेताना डेटा आधारित मार्गदर्शन मिळणार असून गुंतवणुकीचे नियोजन अधिक प्रभावीपणे करता येणार आहे. बाजारातील बदल, उत्पन्न-खर्चातील चढउतार, संभाव्य धोके तसेच आर्थिक प्रवाह यांचे विश्लेषण करून योग्य निर्णय घेण्यास हे उपकरण उपयुक्त ठरणार असल्याचे संशोधकांनी सांगितले.
सदर पेटंटचा नोंदणी क्रमांक ४८५६२८-००१ असून दिनांक ३० डिसेंबर २०२५ रोजी त्याची नोंदणी करण्यात आली आहे. सातत्यपूर्ण अभ्यास, समन्वयपूर्ण प्रयत्न आणि नाविन्यपूर्ण दृष्टिकोनातून हे संशोधन यशस्वी झाले आहे. या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजाराम राठोड, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष विक्रांत पाटील, सदस्या संगीता पाटील तसेच समितीचे सन्माननीय सदस्य प्रसाद मोहरकर यांनी संशोधकांचे अभिनंदन केले. तसेच अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे प्रमुख डॉ. अतुल भावे यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभल्याचे संशोधकांनी नमूद केले.
या यशामुळे महाविद्यालयाची शैक्षणिक व संशोधन क्षेत्रातील ओळख अधिक बळकट झाली असून विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची प्रेरणा निर्माण होणार आहे. विविध स्तरांतून संशोधकांचे अभिनंदन होत असून महाविद्यालयासाठी ही अत्यंत अभिमानाची बाब मानली जात आहे.



