रत्नागिरी

देवरुख महाविद्यालयात भोसले कुटुंबीयांच्या बहुमूल्य देणगीतून ‘स्व. ललिता सावळाराम भोसले वाचन कक्षा’ची निर्मिती

देवरुख दि. ११ ( प्रतिनिधी ):- देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयाच्या ग्रंथालयात भोसले कुटुंबीयांच्या उदार देणगीतून सुसज्ज असा ‘स्व. ललिता सावळाराम भोसले वाचन कक्ष’ उभारण्यात आला असून यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी प्रेरणादायी व शांत वातावरणाची निर्मिती झाली आहे. या वाचन कक्षामुळे महाविद्यालयातील विद्यार्थी, संशोधक व वाचकांना अभ्यासासाठी अधिक सुसंगत आणि एकाग्रतेस पूरक अशी सुविधा उपलब्ध झाली आहे.

देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष कृष्णकुमार भोसले व सौ. कीर्ती भोसले यांनी या वाचन कक्षासाठी बहुमूल्य देणगी देऊन या उपक्रमासाठी पुढाकार घेतला. तसेच उर्वरित आवश्यक आर्थिक सहाय्य देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाने स्वतः उचलून या वाचन कक्षाच्या निर्मितीत महत्त्वाचे योगदान दिले. या वाचन कक्षाला ‘स्व. ललिता सावळाराम भोसले वाचन कक्ष’ असे नाव देऊन एका पवित्र स्मृतीला ज्ञानाच्या कार्याशी जोडण्यात आले आहे. आपल्या प्रिय व्यक्तीच्या स्मृती जपत समाजोपयोगी कार्य घडवून आणण्याचा हा प्रेरणादायी उपक्रम असून तो विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड वाढविण्यासाठी निश्चितच उपयुक्त ठरणार आहे.

नूतन वाचन कक्षाचे उद्घाटन कृष्णकुमार भोसले यांच्या मातोश्री अलकाताई भोसले यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या उद्घाटन सोहळ्यास संस्थेचे पदाधिकारी, महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी कृष्णकुमार भोसले यांचे बंधू प्राचार्य डॉ. शशिकांत चौधरी हेही या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित होते. देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने भोसले कुटुंबीयांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करून, त्यांच्या या उदात्त व समाजोपयोगी योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. कार्यक्रमादरम्यान श्री. कृष्णकुमार भोसले यांनी आपल्या परिवारातर्फे संस्थेचे अध्यक्ष सदानंद भागवत, कार्यवाह शिरीष फाटक, प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर तसेच ग्रंथपाल प्रा. सुभाष मायंगडे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

संस्थाध्यक्ष सदानंद भागवत यांनी आपल्या मनोगतात भोसले कुटुंबीयांच्या उदार देणगीबद्दल त्यांचे विशेष कौतुक करून आभार व्यक्त केले. अशा प्रकारच्या सामाजिक जाणीवेतून केलेले उपक्रम शैक्षणिक संस्थांसाठी अत्यंत महत्त्वाचे असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी ते उपयुक्त ठरतील असे त्यांनी नमूद केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी शांत आणि सुसज्ज वातावरण मिळणे ही अत्यंत गरजेची बाब आहे. या वाचन कक्षामुळे विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होऊन त्यांच्या अभ्यासात सातत्य आणि गुणवत्ता वाढण्यास निश्चितच मदत होईल असे याप्रसंगी नमूद केले.

संस्था उपाध्यक्ष भोसले यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, या वाचन कक्षाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या सुविधा मिळाव्यात हीच आमची भावना आहे. भविष्यातही या वाचन कक्षाला अधिक आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याची आमची तयारी राहील, असे त्यांनी आश्वासन दिले. या उपक्रमासाठी संस्थेचे कार्यवाह शिरीष फाटक तसेच उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील यांनीही आवश्यक सहकार्य केले.

नूतन वाचन कक्षाच्या माध्यमातून ग्रंथालयातील वाचनसंस्कृती अधिक बळकट होण्यास मदत होईल. तसेच विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची शिस्त, विचारांची सखोलता आणि ज्ञानाची आवड वाढीस लागेल, असे मत ग्रंथपाल प्रा. सुभाष मायंगडे यांनी व्यक्त केले. तसेच महाविद्यालयाच्या ग्रंथालय परिवाराने आणि विद्यार्थ्यांनी भोसले कुटुंबीयांच्या या समाजोपयोगी उपक्रमाबद्दल मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button