रत्नागिरी

सावर्डे पोलिस स्थानकातील पोलिस उपनिरीक्षक लाचलुचपतच्या जाळ्यात

चिपळूण दि. २४ :- चिपळूण- सावर्डे पोलिस स्थानकातील पोलिस उपनिरीक्षक मनिष कांबळे लाचलुचपतच्या जाळ्यात अडकले. १५ हजार रूपये लाच प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चिपळूणात सोमवारी सायंकाळी सापळा रचून ही कारवाई केली. विम्याच्या दाव्यासाठी आवश्यक कादगपत्रे देण्याकरिता कांबळे यांनी तब्बल २५ हजारांची लाच मागितल्यानंतर तडजोडीअंती १५ हजार रूपयांवर तोडगा पडला होता. सेवानिवृत्तीला वर्षभराचा कालावधी बाकी असतानाच कांबळे याच्यावर ही मोठी कारवाई झाली आहे.

रत्नागिरी विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चिपळूण येथे सापळा रचून ही कारवाई केली. सावर्डे पोलीस स्थानकातील पोलिस निरीक्षक मनीष कांबळे यांच्याकडे गुन्हा रजिस्टर क्रमांक १४/२०२६ चा तपास प्रलंबित होता. या गुन्ह्यातील मृत व्यक्तीच्या वारसांना विमा रक्कम मिळण्यासाठी क्लेम ट्रिब्युनल कोर्टात दावा दाखल करावयाचा होता. त्यासाठी अपघातातील वाहनाचा आरटीओ तपासणी अहवाल व डीअेआर फॉर्म आवश्यक होते. ही कागदपत्रे देण्यासाठी पोलीस उपनिरीक्षकाने २२ फेब्रुवारी रोजी २५ हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यानंतर तक्रारदाराने २३ फेब्रुवारी रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार दिली.

त्यानंतर याविषयी दोन पंचाच्या उपस्थितीत पडताळणी केली असता कांबळे याने तडजोडीनंतर १५ हजार रुपये देण्यास सांगितले. ही रक्कम स्वतःकडे न घेता अभिजित प्रकाश शिर्के (४२, रा. पाग, चिपळूण) या खाजगी इसमाकडे देण्याचे निर्देश तक्रारदारास फोनद्वारे दिल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर सापळा चिपळूण पोलीस स्थानकाजवळील सोमेश्वर जनरल स्टोअर्स या दुकानात तक्रारदाराने खाजगी इसम शिर्के यांची भेट घेतली. त्यावेळी शिर्के यांनी फोनवरून संबंधित कांबळे याच्याशी संपर्क साधला. दोघांतील संभाषणानंतर शिर्के यांनी तक्रारदाराकडून १५ हजार रुपये पंचासमक्ष स्वीकारले.

ही रक्कम पोलीस उपनिरीक्षकांच्या सांगण्यावरून व स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी स्वीकारल्याचे निष्पन्न झाल्याने लाचलुचपत विभागाने शिर्के यांना लाच रकमेसह ताब्यात घेतले. या दोघांवर मंगळवारी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू होती. ही कारवाई पोलीस अधीक्षक शिवराज पाटील, अपर पोलीस अधीक्षक भागवत सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी येथील पोलीस उपअधीक्षक अविनाश पाटील यांच्या पर्यवेक्षणाखाली पोलीस निरीक्षक मच्छिंद्र जाधव, सुहास रोकडे व त्यांच्या पथकाने सापळा यशस्वी केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button