महाआरोग्य सन्मान सोहळ्यात रत्नागिरीतील डॉ. सुप्रीम कांबळे व आशा स्वयंसेविका ईश्वरी जाधव यांचा राज्यस्तरीय गौरव

रत्नागिरी दि. २४ :- महाआरोग्य सन्मान 2026 सोहळ्यात रत्नागिरीतील डॉ. सुप्रीम कांबळे व आशा स्वयंसेविका ईश्वरी जाधव यांचा राज्यस्तरीय गौरव करण्यात आला.

मुंबई येथील यशवंतराव चव्हाण केंद्र येथे सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत आयोजित राज्यस्तरीय कार्यक्रमात “वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्कार” व “महाआरोग्य सन्मान – 2026” प्रदान करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र पॅलेऍटिव्ह केअर कार्यक्रमाचा तसेच राज्यातील ५८० ठिकाणी सुरू करण्यात आलेल्या मेनोपॉज क्लिनिक उपक्रमाचे राज्यस्तरीय लोकार्पण करण्यात आले.
कार्यक्रमात आरोग्यमंत्री नामदार प्रकाश आबिटकर म्हणाले की, “महाराष्ट्राची पॅलेऍटिव्ह केअर योजना देशाला दिशादर्शक ठरेल. वृद्ध, गंभीर आजार व असहाय्य रुग्णांना घरी जाऊन सन्मानपूर्वक आरोग्य सेवा देणे हे या योजनेचे वैशिष्ट्य आहे. सार्वजनिक आरोग्य विभाग ‘आरोग्याच्या ध्यास, महाराष्ट्राचा विकास’ या संकल्पनेतून विविध लोकोपयोगी उपक्रम राबवत आहे.” राज्यातील सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांनी ही योजना प्रभावीपणे राबवावी, असे आवाहन त्यांनी केले.
या सोहळ्यात रत्नागिरी जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र तळवली, तालुका गुहागर येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. सुप्रीम कुमार प्रकाश कांबळे यांना “वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्कार” तर तालुका मंडणगड अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र कुंबळे उपकेंद्र म्हाप्रळ येथील आशा स्वयंसेविका श्रीम. ईश्वरी जाधव यांना “महाआरोग्य सन्मान – 2026” प्रदान करण्यात आला. हा सन्मान आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर व राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते देण्यात आला.
सार्वजनिक आरोग्य सेवा, जनजागृती, प्रतिबंधात्मक उपाययोजना व गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल हा गौरव प्रदान करण्यात आला. ग्रामीण भागात मातृ-बाल आरोग्य, लसीकरण, संसर्गजन्य आजार प्रतिबंध आणि घरभेटींद्वारे प्रभावी सेवा देण्यात दोन्ही पुरस्कारार्थींनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
कार्यक्रमात २३ जणांना “वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्कार” तर विविध क्षेत्रातील १७० जणांना “महाआरोग्य सन्मान 2026” प्रदान करण्यात आला. यावेळी आरोग्यमंत्री म्हणाले की, “प्रत्येक क्षेत्रात चांगले काम करणाऱ्यांचा गौरव झाला पाहिजे. महाराष्ट्र आरोग्यसंपन्न बनवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे कार्य करूया.”
राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी आशा स्वयंसेविकांना सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा कणा संबोधत त्यांच्या कार्याचे कौतुक केले. महिला आरोग्याच्या दृष्टीने मेनोपॉज क्लिनिक उपक्रम अत्यंत महत्त्वाचा असून ग्रामीण व शहरी भागातील गैरसमज दूर करण्यासाठी तो उपयुक्त ठरेल, असे त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमास सार्वजनिक आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी व आरोग्य कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रत्नागिरी जिल्ह्यासाठी हा अभिमानाचा क्षण असून जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागामार्फत दोन्ही पुरस्कारार्थींचे अभिनंदन करण्यात आले आहे.



