रत्नागिरी

४२ कोटी ६० लाख रक्कमेचा अर्थसंकल्प मंजूर; देवरुखच्या विकासाला नवी गती

देवरुख दि. २४ :- देवरुख नगरपंचायतचा सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठीचा तब्बल ४२ कोटी ६० लाख रुपयेचा अर्थसंकल्प सर्वसाधारण सभेत दणक्यात मंजूर करण्यात आला. शहराच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासाचा रोडमॅप या अर्थसंकल्पातून स्पष्ट करण्यात आला आहे.

नगराध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत मुख्याधिकारी व लेखा विभागाने अर्थसंकल्प सादर करताना आर्थिक शिस्त, पारदर्शकता आणि विकासाभिमुख नियोजन यावर भर दिला. मर्यादित साधनसामग्रीतूनही रु. ४ लाख २३ हजार रुपये शिलकीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आल्याने प्रशासनाच्या नियोजनक्षमतेचे कौतुक करण्यात आले.

या अर्थसंकल्पात नवीन पाणीपुरवठा योजना बळकटीकरण, स्वच्छता व्यवस्था, रस्ते दुरुस्ती व बांधकाम, गटारी बांधकाम, भटक्या कुत्र्यांसाठी निवारा, शहरात सीसीटीव्ही यंत्रणा तसेच विविध शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. नागरिकांच्या दैनंदिन गरजांना केंद्रस्थानी ठेवून विकासकामांना प्राधान्य देण्यात आले असल्याचे स्पष्ट करण्यात आले. महसुली व भांडवली खर्चाचे सुयोग्य नियोजन करत नागरीकांना मुलभूत सेवा सुविधा अधिक सक्षमपणे उपलब्ध करुन देण्याचा आराखडा मांडला आहे.

सभेदरम्यान काही सदस्यांनी सूचना व अपेक्षा मांडल्या; मात्र सकारात्मक चर्चा होऊन सर्वांनी शहराच्या हिताला प्राधान्य देत अर्थसंकल्पास पाठिंबा दर्शविला. येणाऱ्या आर्थिक वर्षात देवरुख शहराच्या विकासाला गती देण्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button