रत्नागिरी

आरोग्य जपणे का गरजेचे आहे ? 

आपण रोज सकाळी उठून मोबाईलला १००% चार्ज करतो, न चुकता गाडीत पेट्रोल भरतो, बँकेत पैसे साठवतो. पण ज्या शरीराने हे सगळे भोगायचे आहे त्या शरीराला चार्ज करायला आपण विसरतोच.

माझ्याकडे एक ३५ वर्षांचा तरुण आला. आयटी कंपनीत मोठा पगार असलेला माणूस . पुण्यात त्याचा स्वतःचा फ्लॅट आहे. त्याची तक्रार काय तर , “ताई, झोपच लागत नाही मला. गोळी घेतल्याशिवाय पोट साफ होत नाही.” रिपोर्ट सगळे नॉर्मल आहेत. मग आजार कुठे आहे ? कळत नाही .

इथेच आयुर्वेद वेगळे ठरते . आयुर्वेद म्हणते की ,तुम्ही आजारी नाही तर तुमची दिनचर्या आजारी आहे.

आपण शरीराला एक यंत्र समजतो. बिघडले की डॉक्टरकडे नेऊन दुरुस्त करायचे. पण आयुर्वेद शरीराला बाग समजते . बागेला रोज पाणी, ऊन, काळजी लागते. एक दिवस दुर्लक्ष केले तरी रोपं कोमेजतात. तसंच आपल्या आरोग्याचे आहे .

सकाळी उठल्यावर आपण ब्रश करतो . पण जीभ साफ करतो का? रात्रभर जिभेवर साठलेला पांढरा थर म्हणजे ‘आम’ असते . आम म्हणजे शरीरात साठलेले विष असते . हा आम रोज थोडा थोडा पोटात गेला तर दहा वर्षांनी तोच मधुमेह, स्थूलता, सांधेदुखी बनतो.आपण तहान लागली की फ्रीजमधले थंड पाणी पितो. आयुर्वेद सांगते की अग्नीवर थंड पाणी ओतले की अग्नी विझतो. पचनाचा अग्नी विझला की अन्न पचत नाही तर ते सडते आणि रोग तयार होतात. म्हणूनच कोमट पाणी हा साधा उपाय ५०% आजारांना थांबवतो.

म्हणून आरोग्य जपणे म्हणजे महागडी औषधे घेणे नाही. तर वेळेवर झोपणे, भुकेपेक्षा थोडे कमी खाणे, रोज २० मिनिटे चालणे आणि मन शांत ठेवणे.

एक गोष्ट लक्षात ठेवा आरोग्य ही बँकेतली एफडी नसते .जी एकदा भरली की विसरायची. आरोग्य हे करंट अकाऊन्ट सारखे असते. रोज त्यात चांगल्या सवयींची गुंतवणूक करावी लागते. तरच व्याज म्हणून चांगले आरोग्य मिळते.

– लतिका पेजे – ताम्हणकर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button