मिशन जीवन अंतर्गत साखरी-नाटे येथे ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न

जैतापूर दि. २६ :- राजापूर तालुक्यातील साखरी-नाटे येथे रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या मिशन जीवन या उपक्रमांतर्गत ज्येष्ठ नागरिकांच्या वाढदिवसाचा तसेच सत्कार समारंभाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या सामाजिक उपक्रमाला परिसरातील ज्येष्ठ नागरिक व ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद लाभला.
या कार्यक्रमाला अप्पर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम, सागरी पोलीस ठाणे नाटेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्यासह पोलीस कर्मचारी, पोलीस पाटील व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
साखरी-नाटे तसेच परिसरातील जवळपास चारशे ते पाचशे वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते केक कापून त्यांचे वाढदिवस साजरे करण्यात आले. तसेच सुमारे दोनशे ते अडीचशे ज्येष्ठ नागरिकांना शुभेच्छा देणारी प्रमाणपत्रे देऊन त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. या उपक्रमामुळे उपस्थित ज्येष्ठ नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता.
कार्यक्रमादरम्यान अप्पर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी यांनी मिशन जीवन आणि मिशन प्रतिसाद या उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. जिल्हा पोलीस दलाच्या वतीने नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असून अडचणीच्या प्रसंगी ज्येष्ठ नागरिकांना पोलिसांकडून तात्काळ प्रतिसाद मिळावा, तसेच पोलीस आणि नागरिक यांच्यातील संबंध अधिक विश्वासाचे व दृढ व्हावेत, हा या उपक्रमांचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. एकट्या राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांशी संवाद वाढवणे, त्यांच्या अडचणी समजून घेणे आणि समाजात सुरक्षिततेची भावना निर्माण करणे यावर पोलीस प्रशासनाचा विशेष भर असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमाच्या पूर्वी याच ठिकाणी प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध सांस्कृतिक व देशभक्तीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करत त्यांचा वाढदिवस साजरा करण्याचा हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरला असून, या माध्यमातून पोलीस आणि नागरिकांमधील नाते अधिक दृढ झाल्याची भावना उपस्थित ग्रामस्थांनी व्यक्त केली.
या कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर साखरी नाटे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य , जमातूल मुस्लिम कमिटीचे पदाधिकारी, ऍक्टिव्ह ग्रुप साखरी नाटेचे पदाधिकारी यांसह सामाजिक कार्यकर्ते ग्रामस्थ आणि पोलिस कर्मचारी उपस्थित होते.
साखरी नाटे ग्रामस्थांच्या वतीने अप्पर पोलीस अधीक्षक बीबी महामुनी, विभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. सागरी पोलीस ठाण्याच्यावतीने सर्वांचे आभार मानण्यात आले आहेत.



