नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ अनुषंगाने शहरात पोलिसांचे रुट मार्च
वाहन तपासणीत कर्कश आवाज करणारे सायलेन्सर जप्त

रत्नागिरी दि. ३० :- नगर परिषद निवडणूक 2025 करिता कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे, प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे, तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना दृढ करणे या उद्देशाने रत्नागिरी पोलीस दलातर्फे रत्नागिरी शहरात रूट मार्च घेण्यात आला. त्याचवेळी कर्कश आवाज करणारे सायलेन्सर जप्त करण्यात आले.
रत्नागिरी शहर पोलीस ठाणे हद्दीत दि. ३० नोव्हेंबर रोजी सकाळी ११.३० ते १२.३० वाजता राज नगर मरकज-पैजाने अत्तार मदरसा श्रीराम चौक कदमवाडी-कीर्ती नगर-जामा मशीद-अलिशान कॉर्नर-क्रांतीनगर ते पुन्हा राज नगर मरकस मैदान पर्यंत रूट मार्च घेण्यात आला.
या रुट मार्चमध्ये ५ पोलीस अधिकारी, १० पोलीस अंमलदार, १ एस.आर.पी.एफ पथक व ७० पोलीस जवान व ६६ होमगार्ड सहभागी झाले होते.
तसेच रत्नागिरी शहर पोलीस ठाणे हद्दीमध्ये वाहन तपासणी मोहीम राबविण्यात आली. या वाहन तपासणी दरम्यान, एका दुचाकी वाहनावर दंडात्मक कारवाई करून कर्कश आवाज करणारे सायलेंसर्स जप्त करण्यात आलेले आहेत.
वाहन चालकाने बदल केलेले (Modified) सायलेन्सर आढळून आल्याने त्याच्यावर मोटर वाहन कायद्याअन्वये कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे.



