रत्नागिरी

राजापूर एसटी आगाराचा मनमानी कारभार; पहाटेची आंबोळगड–रत्नागिरी एसटी पुन्हा रद्द

नाटे, आंबोळगड, आडिवरे, नवेदर, कशेळी ते गावखडीपर्यंत विद्यार्थ्यांची पहाटेची रखडपट्टी

जैतापूर दि. १ (राजन लाड) :- राजापूर एसटी आगाराचा बेजबाबदार आणि बेफिकीर कारभार आज पुन्हा एकदा उघड झाला. रोज सकाळी ५ वाजता सुटणारी अत्यावश्यक आंबोळगड–रत्नागिरी ही पहाटेची एसटी अचानक रद्द करण्यात आली.

यामुळे नाटे, आंबोळगड, आडिवरे, नवेदर, कशेळी, गावखडी या सर्व भागातील विद्यार्थी आणि प्रवासी पहाटेच्या धुक्यात एसटी स्टॉपवर तासन्‌तास ताटकळत उभे राहिले.

रत्नागिरी कॉलेजला जाणारे विद्यार्थी, मच्छी व्यवसाय करणाऱ्या गरीब महिला, रेल्वेसाठी सकाळी निघणारे प्रवासी — यांचा एकमेव आधार असणारी ही पहिली एसटी आज पुन्हा दणक्यात रद्द! यात सर्वात मोठा धक्का म्हणजे राजापूर एसटी आगाराचा फोन संपूर्ण बंद.

एक विद्यार्थ्याने व्हॉट्सअप ग्रुपवर अधिकाऱ्यांना विचारले असता, “काल एसटी सहलीला गेल्यामुळे गाडी रद्द झाली असेल,” असा झोपेतून उठल्याचा भास व्हावा असा निष्काळजी प्रतिसाद देण्यात आला.

याआधी अनेकदा हीच परिस्थिती निर्माण होत असल्याने विद्यार्थ्यांनी स्वतःहून व्हॉट्सअप ग्रुप तयार केला होता व आगारातील २–३ अधिकाऱ्यांना विनंतीपूर्वक त्यात जोडले होते.

पण तरीही गाडी रद्द सूचना देण्याची किमान जबाबदारीही आगारातील कुणीही घेत नाही.

आजची परिस्थिती एवढी बेशिस्त की, “आंधळं दळतंय आणि कुत्रं पिठ खातंय” ही म्हण अक्षरशः राजापूर एसटी आगाराच्या कामकाजावर तंतोतंत लागू पडते!

कोणी काय करतंय, कोण जबाबदार, कोणावर कारवाई, कोणाकडे नियंत्रण — काहीच नियोजन नाही, फक्त गोंधळच गोंधळ!

राजापूर तालुक्यातील अनेक मार्गांवर गाड्या विनासूचना रद्द होण्याचे प्रकार सुरूच असल्याने प्रवाशांमधून संताप उसळला आहे. विद्यार्थ्यांचे भविष्य, महिलांची रोजीरोटी आणि प्रवाशांची गैरसोय — हे सर्व दुर्लक्षितच.

स्थानिकांचा सरळ सवाल — या मनमानीवर अंकुश ठेवणारा कोणी आहे की नाही?

दरम्यान, राजापूर तालुक्यातील समस्यांना कोणी वालीच नसल्याचे चित्र असून किमान क्षेत्रातील समस्यांना एका फोनवर प्रतिसाद देणारे म्हणून ओळख असणारे आमदार किरण सामंत यांनी तातडीने हस्तक्षेप करावा, अशी जोरदार मागणी विद्यार्थी, पालक आणि प्रवासीवर्गाकडून होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button