रत्नागिरी

आर्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या प्रदर्शनात विष्णु परीट यांच्या चित्राची निवड 

आर्ट सोसायटी ऑफ इंडियाला १०८ वर्षांची परंपरा; चित्रकार परीट यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव

संगमेश्वर दि. २४ ( प्रतिनिधी ):- गेली ४० वर्षे जलरंगात काम करणारे संगमेश्वर तालुक्यातील सोनवडे येथील प्रथितयश चित्रकार विष्णू परीट यांच्या जलरंग चित्राची निवड आर्ट सोसायटी ऑफ इंडियाने त्यांच्यातर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या चित्र प्रदर्शनासाठी केली आहे. या यशाबद्दल चित्रकार विष्णू परीट यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

आर्ट सोसायटी ऑफ इंडिया ही देशस्तरावरील संस्था कलाकारांच्या कलेला प्रोत्साहन देण्यासाठी देशातील विविध भागात अनेक उपक्रम राबवत असते. देशातील चित्रकारांकडून चित्र – शिल्प यांची छायाचित्र मागवून त्यातून उत्तम कलाकृतींची निवड केली जाते. या सर्व कलाकृतीचे प्रदर्शन दरवर्षी मुंबई येथे भरवले जाते. यावर्षी या प्रदर्शनाचे हे १०८ वे वर्ष आहे. या प्रदर्शनात विष्णू परीट यांच्या जलरंग कलाकृतीची निवड झाली आहे.

विष्णू परीट हे संगमेश्वर तालुक्यातील सोनवडे विद्या मंदीर येथे ३६ वर्षे कलाशिक्षक म्हणून सेवेत होते. मूळ इचलकरंजी जवळच्या कबनूर येथील विष्णू परीट यांनी आपला शिक्षकी पेशा सांभाळत असताना छंद म्हणून जलरंगात निसर्गचित्रं रेखाटण्यास सुरुवात केली. दररोज एक याप्रमाणे कलाकृती साकारत असताना त्यांनी जलरंगावर प्रभुत्व मिळवलं. विविध निसर्गचित्रं स्पर्धातून भाग घेत असताना त्यांनी अनेक पारितोषिके मिळवली. विविध मान्यवरांनी त्यांची चित्रे विकत घेऊन आपल्या संग्रहि ठेवली आहेत.

चित्रकार विष्णू परीट यांची आजवर चिपळूण, रत्नागिरी, कोल्हापूर, पुणे, मुंबई याठिकाणी प्रदर्शने संपन्न झाली आहेत. गतवर्षी त्यांच्या चित्राला बॉम्बे आर्ट सोसायटीतर्फे उत्कृष्ट कलाकृतीचे पारितोषिक राज्यपाल महोदयांच्या हस्ते प्राप्त झाले आहे. साधी परंतु अर्थपूर्ण चित्ररचना, प्रवाही रंगसंगती आणि जिवंत भाव, रंगाचा ताजेपणा, मोजकेच रंग आणि रेखाटनातील सातत्य ही विष्णू परीट यांच्या चित्ररेखाटनाची वैशिष्ट्य आहेत. गेली ४० वर्षे जलरंगात काम करुनही परीट हे स्वतःला अजूनही विद्यार्थी समजतात.

आर्ट सोसायटी ऑफ इंडियाने विष्णू परीट यांच्या कलाकृतीची प्रदर्शना साठी निवड केल्यानंतर त्यांचे ज्येष्ठ चित्रकार शिल्पकार प्रकाश राजेशिर्के, सह्याद्री कलामहाविद्यालयाचे प्राचार्य माणिक यादव, इचलकरंजी कला महाविद्यालयाचे प्राचार्य पाटील, चित्रकार अमित सुर्वे, रुपेश सुर्वे, प्रदीप देडगे, अवधूत खातू, विक्रांत बोथरे, मिरज कला महाविद्यालयचे प्राचार्य सूर्यकांत होळकर, चित्रकार मनोज सुतार, श्रीरंग मोरे, दत्ता हजारे,सतीश सोनवडेकर, विक्रांत दर्डे, प्राध्यापक धनंजय दळवी, रत्नागिरी येथील उद्योजक आणि कलाप्रेमी विवेक शानभाग, कोकण कला विकास संस्था आदींनी अभिनंदन केले आहे.

आर्ट सोसायटी ऑफ इंडियाने निवडलेले चित्र जयगड खाडीतील असून शांत जलाशयावर तरंगणारी होडी हे माझ्या जीवनप्रवासाचे प्रतीक आहे. कधी स्थिर कधी प्रवाहासोबत वाहणारे जीवन या होडीप्रमाणेच असते. आकाशातील सौम्य निळसर करड्या रंग छटा आणि दूरवर पसरलेला किनारा अंतर्मुखतेची भावना निर्माण करतो. रंगाच्या मृदू छटानमधून मी शांतता, आशा आणि एकाकीपणातील सौदंर्य दर्शविण्याचा प्रयत्न केला आहे

— विष्णू परीट, चित्रकार

चित्रकार विष्णू परीट हे गेली ४० वर्षे जलरंग माध्यमात काम करत आहेत. कामातील सातत्य आणि विविध प्रयोग करत त्याचा आपल्या कलाशैलीत कल्पकतेने वापर करणं , हे परीट यांचे खास वैशिष्ट्य आहे. निसर्गचित्रं रेखाटताना जणू निसर्ग त्यांच्या जवळ संवाद साधतो, असं त्यांनी साकारलेल्या कलाकृती पाहताना वाटतं. चित्रकार विष्णू परीट यांचा हा कलाप्रवास आता देशस्तरापर्यंत पोहचला आहे, लवकरच तो आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहचेल असा मला विश्वास आहे.

– प्रकाश राजेशिर्के, ज्येष्ठ चित्रकार शिल्पकार

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button