मालगुंड येथे कवितेच्या राजधानीत रंगले काव्य संमेलन

गणपतीपुळे दि. ९ (वैभव पवार) : मराठी नवकवितेचे जनक कवी केशवसुतांची जन्मभूमी व पुस्तकाचं गाव असलेल्या माल्यकुट अर्थात रत्नागिरीतील मालगुंड गावातील कवी केशवसुत स्मारकामध्ये कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वार्षिक पुरस्कार सोहळ्याच्या पूर्वसंध्येला राज्यातील कवींचे कवी संमेलन उत्साहात संपन्न झाले.
कोकण मराठी साहित्य परिषदेच्या स्थापनेपासून संस्थापक अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांच्यासमवेत कोमसापच्या जडणघडणीत आघाडीवर असलेले विश्वस्त कै. अरूण नेरूरकर व जेष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित काव्य संमेलनाचे उद्घाटन कोमसाप अध्यक्षा नमिताताई किर व कार्याध्यक्ष डॉ. प्रदीप ढवळ यांच्या शुभहस्ते व विश्वस्त एल. बी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. या प्रसंगी कवी केशवसुत स्मारक समितीचे अध्यक्ष गजानन पाटील, केंद्रीय कार्यवाह माधव अंकलगे, उषाताई परब, युवाशक्ती प्रमुख अरुण मोर्ये, मुंबई जिल्हाध्यक्षा विद्या प्रभू, पालघर जिल्हाध्यक्ष प्रविण दवणे, ठाणे जिल्हाध्यक्ष बाळ कांदळकर, मालगुंड शाखाध्यक्षा नलिनी खेर, ग्रुप ग्रामपंचायत सत्कोडींचे सरपंच सतिश थुळ व राज्यभरातील कवी व साहित्यप्रेमी उपस्थित होते.
विश्वस्त अरुण नेरूरकर व जेष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर यांच्या स्मृतीला व कार्याला अभिवादन करून रायगड साहित्य भूषण जेष्ठ कवी एल बी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झालेल्या काव्यसंमेनाचे बहारदार निवेदन युवा कवी अरुण मोर्ये व कवी महेंद्र म्हात्रे यांनी केले. नूतन पाटील व सहकारी यांनी सादर केलेल्या ईशस्तवनाने सुरू झालेल्या या विविधरंगी काव्य मैफिलीत उषाताई परब, प्रविण दवणे, भरत पाटील, स्मिता पाटील, रमेश पाटील, अजय शिगू, ज्योत्स्ना राजपूत, न.ग. पाटील, प्रकाश वैद्य, स्नेहाराणी गायकवाड, रमाकांत पाटील, भुपेंद संख्ये, अमेय धोपटकर, रविंद्र मेहंदळे, समृद्धी गोणबरे, चिन्मयी गोणबरे, उज्ज्वला बापट आदी कवींनी स्वरचित कविता सादर केल्या. यावेळी ग्रुप ग्रामपंचायत सत्कोडी सरपंच सतिश थुळ यांनीही एका कवितेचे सादरीकरण केले. उत्तरोत्तर रंगत गेलेल्या काव्यसंमेनाची सांगता जेष्ठ कवी एल.बी. पाटील यांच्या आग्रीबोलीतील कवितांनी व पसायदानाने झाली.



