केळंबे येथे जखमी अवस्थेत आढळला बिबट्या

रत्नागिरी दि. ९ :- मौजे केळंबे येथील सुधा विष्णुनगरमधील श्री. बावनाधकर यांच्या प्लॉटिंगमध्ये वन्यप्राणी बिबट हा जखमी अवस्थेत आढळून आल्याची घटना रविवारी दि. ९ रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास दिसून आली.
याबाबत श्री. संपत खानविलकर यांनी भ्रमणध्वनीद्वारे वनविभागास माहिती कळवली. त्यानुसार तात्काळ जागेवर जाऊन पाहणी केली असता सदर ठिकाणी वन्य प्राणी बिबट जखमी अवस्थेत आढळून आला.
सदर बिबट्यास लोखंडी पिंजऱ्यामध्ये सुरक्षितरित्या घेण्यात आले व त्याची पशुवैद्यकीय अधिकारी लांजा यांच्याकडून प्राथमिक तपासणी करण्यात आली बिबट मादी असून, वय वर्ष दोन आहे. तसेच मागील दोन्ही पाय कमकुवत असल्याबाबत पशुवैद्यकीय अधिकारी यांनी माहीती दिली व त्यांनी जखमी बिबट्यावर लांजा येथे उपचार करणे शक्य नसलेने पुढील उपचारासाठी बिबट्यास पुणे येथे पाठवून देण्यास सांगितले.
जखमी वन्यप्राणी बिबट याची माहिती मिळताच आमदार किरण (भैय्या) सामंत, विधानसभा सदस्य लांजा, राजापूर, साखरपा मतदार संघ हे प्रत्यक्ष घटनास्थळी येऊन जखमी बिबट्याची पाहणी केली व त्यांनी जखमी बिबट्यावर तत्काळ उपचार करणेबाबत सूचना दिल्या. त्याप्रमाणे व श्रीमती गिरिजा देसाई विभागीय वन अधिकारी रत्नागिरी (चिपळूण), श्रीमती प्रियंका लगड सहाय्यक वनसंरक्षक रत्नागिरी (चिपळूण), यांचे मार्गदर्शनानुसार बिबट्यावर उपचार करणेसाठी पुणे येथे पाठविण्यात आले.
सदर वन्यजीव बचाव कार्यामध्ये प्रकाश सुतार वनपरिक्षेत्र अधिकारी रत्नागिरी, सारीक फकीर वनपाल लांजा, बाबासाहेब ढेकळे वनरक्षक कोर्ले, नमिता कांबळे वनरक्षक लांजा, संजय गोसावी, सत्यवान गुरव वनमजूर लांजा, नासिर नवलेकर, नितेश राणे, दीप्ती शेटकर लांजा पोलिस, पांडुरंग साळुंखे, राजेश झोरे, सुनील कानडे , महेश लांजेकर, सुधाकर झोरे, बशीर लांजेकर केपूर साळुंखे ग्रामस्थ सहभागी होते.
अशा प्रकारच्या घटना घडल्यास वनविभागाचा टोल फ्री क्रमांक 1926 किंवा 9421741335 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन विभागीय वन अधिकारी गिरीजा देसाई यांनी केले आहे.

