रत्नागिरी

अफाट कष्टातून तयार झालेल्या परसदारच्या भाज्यांना स्वाद अंतर्मनातील प्रेमाचा!

बाजारपेठेत मिळू लागल्या गावठी भाज्या

संगमेश्वर दि. २८ ऑगस्ट ( प्रतिनिधी ):- कोकणातील शेतकऱ्यांच्या संसाराचे अर्थकारण घरातील स्त्रीच्या म्हणजेच त्याच्या पत्नीच्या हाती असतं. काबाडकष्ट करत पदराच्या गाठीला चार पैसे बांधून शेतकऱ्याची सहचारणी संसाराचं आर्थिक गणित सोडवते. पावसाळ्यात परसदारी केल्या जाणाऱ्या भाज्यांवरच शेतकरी कुटुंबाचा संसार चालत असतो. सध्या कोकणच्या विविध भागात अनेक प्रकारच्या रानभाज्या विक्रीसाठी ‘ माम्या ‘ घेऊन बसल्या असल्याचे दृश्य पाहायला मिळत आहे.

अक्षय्यतृतीयेला कोकणात घरासमोर गावठी भाज्यांच्या बिया रुजत घातल्या जातात. यामध्ये विशेष करुन पडवळ, दोडका, काकडी, कारलं, दुधी, लाल भोपळा , पारोसे यांचा समावेश असतो. पाऊस सुरु होईपर्यंत ही भाज्यांची अळी पाण्याने शिपली जातात. अक्षय्यतृतीयेला रुजत घातलेल्या बिया कधी रुजल्या नाहीत असं होत नाही. वेल चांगले फोफावू लागले की, शेतकरी कुटुंबाच्या चेहऱ्यावर आनंद फुलू लागतो. या वेलांवर शेतकरी कुटुंबाचं पुढील आर्थिक गणित अवलंबून असतं. अक्षय्यतृतीयेला लावलेल्या बियांचं मजबूत वेलात रूपांतर व्हायला लागलं की, त्यावर येणारी फुलं शेतकऱ्याच्या पत्नीचं मन फुलवू लागतात.

परसदारच्या भाज्या विक्रीसाठी जेवढ्या लवकर बाजारात येतील तेवढा त्याला दर चांगला मिळतो. यामुळे शेतकरी कुटुंबाचा परसदारच्या भाज्या लवकरात लवकर बाजारात आणण्याचा प्रयत्न असतो. शेतकऱ्याचं सम्पूर्ण कुटुंब परसदारच्या भाज्याच्या वेलांची अक्षरश: आपल्या मुलाप्रमाणे काळजी घेतात. त्यामुळे यावर उत्तम फळधारणा होते. या भाज्यामध्ये खरंतर शेतकरी कुटुंबाचे प्रेम मिसळलेले असल्यामुळे या भाज्यांची चव अवीट अशीच बनते. कोकणात परजिल्ह्यातून विक्री साठी येणाऱ्या भाज्यांच्या दरापेक्षा कोकणातील परसदारच्या भाज्यांचे दर तुलनेत कमी असतात.

विशेष म्हणजे परदारच्या या भाज्यांना केवळ सेंद्रिय खतंच घातली जातात. या भाज्यांवर कोणतेही रासायनिक मिश्रण फवारले जात नाही त्यामुळे या भाज्या आरोग्यासाठी उत्तम असतात. खरंतर ग्राहकांनी परसदारच्या भाज्या कोकणातील या माम्याकडून खरेदी करताना त्यांचे अफाट कष्ट लक्षात घेऊन दर पाडून मागताना अनेकदा विचार करावा . या भाजी विक्रीतून पुढे येणाऱ्या गणेशोत्सवाचं आर्थिक गणित शेतकऱ्याच्या पत्नीला सोडवायचं असतं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button